Thu, Apr 25, 2019 07:42होमपेज › Pune › ‘ओएलएक्स’वरून दुचाकी खरेदी महागात

‘ओएलएक्स’वरून दुचाकी खरेदी महागात

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 25 2017 12:46AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

ओएलएक्स संकेतस्थळावरून कमी किमतीत दुचाकी देण्याच्या आमिषाने एका नागरिकाला तब्बल सात लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ चार दिवसांमध्ये त्याच्याकडून सात लाख रुपये घेण्यात आले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शंतनू निर्मलचंद मित्रा (वय 36, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनू मित्रा यांचे एमबीए झाले आहे. ते पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत एचआर डायरेक्टर आहेत. दरम्यान त्यांनी चार दिवसांपूर्वी ओएलएक्सवर हायभुसा या बहुराष्ट्रीय कंपनीची दुचाकी 9 लाख 50 हजार रुपयांना विक्रीसाठी असल्याचे पाहिले. त्यांनी याबाबत माहिती घेतली. तसेच, संबंधित व्यक्तीने ही दुचाकी 7 लाख 50 हजार रुपयांना देण्याचे सांगितले. त्यानंतर गौतम नावाच्या व्यक्तींने त्यांना फोन करून साडेसात लाख रुपयांना दुचाकी मिळेल, असे सांगितले.

तसेच, प्रथम 95 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार, नवी दिल्ली येथील सेंट्रल बँकेत अमन कुमार या नावाने असणार्‍या खात्यावर फिर्यादी यांनी प्रथम 95 हजार भरले. त्यानंतर आणखी काही पैसे भरण्यास लावले. दोन दिवसांनी त्यांना दुचाकी घेऊन जाण्यासाठी मुंबईत बोलावले. ते मुंबईत गेल्यानंतर आज दुचाकी मिळू शकत नाही, असे सांगत दुसर्‍या दिवशी मुंबई विमानतळावर बोलवले. त्यादरम्यान त्यांना दुचाकी कस्टम विभागाने पकडली असून, ती सोडविण्यासाठी वेगळे पैसे लागतील, असे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी असे एकूण 7 लाख रुपये घेतले. 

दरम्यान ते मुंबई विमानतळावर गेले व संबंधित व्यक्तीला फोन केला. त्याने दहा मिनिटांत येतो, असे सांगितले. मात्र, तो काही आला नाही. त्यांनी परत फोन केला. त्या वेळी त्याचा फोन बंद लागला. त्यानंतर फिर्यादी मित्रा यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ येरवडा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) ए. ए. कदम करत आहेत.