Mon, Apr 22, 2019 16:13होमपेज › Pune › पुणेकरांत ‘पेडल’ सायकलची ‘क्रेझ’! 

पुणेकरांत ‘पेडल’ सायकलची ‘क्रेझ’! 

Published On: Mar 11 2018 1:02AM | Last Updated: Mar 11 2018 12:19AMपुणे : केतन पळसकर

पुणेकर नागरिकांना ‘पेडल’ (झएऊअङ) सायकलची क्रेझ जडलेली पाहायला मिळते आहे. दोन रुपयांमध्ये तासभर वापर करता येणारी ही सायकल शहरातील प्रमुख रस्त्यांवर डौलाने मिरवताना दिसते आहे. ‘प्ले-स्टोअर’वरील अ‍ॅप्लिकेशनचा आधार घेत नागरिक ‘पेडल’ सायकलचा मनसोक्त आनंद घेत आहेत.

राज्यातील पुणे-मुंबई या प्रमुख शहरांसह देशातील हैद्राबाद, बंगळूरु, चेन्नई, कलकत्ता, उदयपूर, जयपूर, आग्रा, गुरुग्राम या दहा शहरांमध्ये ‘पेडल’ सायकलची सेवा उपलब्ध आहे. शहरातील फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, बीएमसीसी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, पुणे विद्यापीठ, औंध, वाकडमधील रस्त्यावर ‘पेडल’चे सायकल तळ उपलब्ध आहेत. बंगळूरु येथील ‘झूमकार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने या सायकलची संकल्पना अमलात आणली आहे. आपल्या पेटीएम अकाऊंटचा वापर करीत आपण या सायकलचे किरकोळ भाडे देऊन सायकलचा उपयोग करू शकतो.

पोस्टमनकाकांसह प्रत्येक नागरिक सायकलचा उपयोग मोटारसायकलची सवय जडायच्या आधी करीत होता; मात्र सायकलची जागा मोटारसायकलने घेतल्यानंतर सायकल कालबाह्य झाली आहे. अशा परिस्थितीतसुद्धा ‘पेडल’ सायकलचा उपयोग नागरिक करतानाचे चित्र शहरात दिसते आहे. ‘स्पोर्ट बाईक’सह विविध महागड्या मोटारसायकलची क्रेझ असणार्‍या तरुणवर्गाचे ‘पेडल’ सायकल आकर्षण बनत चालली आहे, हे विशेष; त्यामुळे, या पर्यावरणपूरक सायकलींचे पुणेकरांकडून स्वागत होत आहे.

‘पेडल’ सायकल कशी शोधाल..?

आपल्या अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलमध्ये ‘प्ले स्टोअर’मधून प्रथम झूमकारचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करा.
आपले अ‍ॅप्लिकेशन आपल्या पेटीएम अकाउंटला मोबाइल क्रमांकाने लिंक करा.
त्या अ‍ॅप्लिकेशनचा आधार घेत आपल्या जवळचे ‘पेडल स्टेशन’ शोधा.
सायकलवरील क्यु-आर कोड किंवा 6 अंकी नंबरने ती सायकल अनलॉक करा.
सायकलचा उपयोग करून झाल्यावर आपल्या जवळच्या ‘पेडल स्टेशन’वर ती लॉक करा.

पेडल’ आरोग्यासाठी लाभदायक

पेडल’ सायकल ही वापरायला अत्यंत सोपी आहे. या सायकलीच्या उपलब्धतेमुळे शहरातील ट्रॅफिकपासून दिलासा मिळतो आणि नियोजित स्थळी पोहोचणे सोपे जाते; त्याशिवाय, पर्यावरणपूरक, अत्यंत माफक दरात उपलब्ध होणारी ही सायकल आरोग्यासाठीसुद्धा लाभदायक ठरत आहे.    - पल्लवी शेटे, विद्यार्थिनी