Wed, Jul 17, 2019 10:00होमपेज › Pune › पंतप्रधान आवास प्रकल्पाचे भूमिपूजन रद्द

पंतप्रधान आवास प्रकल्पाचे भूमिपूजन रद्द

Published On: Jul 22 2018 1:10AM | Last Updated: Jul 22 2018 1:04AMपिंपरी : प्रतिनिधी

वादाची किनार असलेला पंतप्रधान आवास योजनेच्या चिखलीतील गृहप्रकल्प आणि  मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे भूमिपूजन सत्ताधारी भाजपने लांबणीवर टाकले आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होऊ घातलेले भूमिपूजन अचानक  लांबणीवर टाकल्याने  चर्चेला उधाण आले आहे. मात्र, भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन नियोजित असल्याचे सांगत याचा इन्कार केला. 

महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या विविध भागातील 10 ठिकाणी 9 हजार 458 सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. यानुसार चर्‍होली येथे 1442, रावेतमध्ये 934, डुडुळगावमध्ये 896, दिघीत 840, मोशी- बोर्‍हाडेवाडीत 1288, वडमुखवाडीत 1400, चिखलीत 1400, पिंपरीत 300, पिंपरीतच आणखी 200 आणि आकुर्डीत 500 सदनिका उभारण्याचे प्रस्तावित आहे. चर्‍होलीतील 1442 सदनिकांच्या गृहप्रकल्पाला मंजुरी दिली आहे.  

चर्‍होलीच्या गृहप्रकल्पाच्या निविदेमध्ये अनियमितता झाल्याचा  आरोप करत या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची  तसेच या प्रकरणातील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत न्यायालयीन चौकशी लावावी. त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेसाठी पारदर्शकपणे पुन्हा सर्व निविदा मागवून हे सर्व प्रकल्प करण्याची मागणीही  मुख्यमंत्र्यांकडे केली गेली.  तसेच मोशी कचरा डेपोतील ’वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पावरुन सत्ताधार्‍यांत एकमत नव्हते.  

त्यामुळे या दोन्ही विषयांवरुन सत्ताधार्‍यांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा असून त्याला वादाची किनार लाभली आहे. या वादामुळेच मुख्यमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन करण्याचे नियोजित केलेला कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. याबाबत  पत्रकार परिषदेत  आमदार लक्ष्मण जगताप यांना विचारले असता ते  म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान यांच्या हस्ते व्हावे, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. त्यामुळे ते पुढे टाकण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ न मिळाल्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचे नियोजित आहे. 

कोटीचं काम निघालं की वाद होणारच 

वादामुळे पंतप्रधान आवासचे भूमिपूजन पुढे ढकलले का, असे विचारले असता आ. लक्ष्मण जगताप म्हणाले, काही कोटींचे काम  निघाले की वाद होतातच. चुका दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न करीत आहोत.