Mon, Aug 19, 2019 17:33होमपेज › Pune › भोसरी विधानसभेचे ‘धनुष्य’ कोण पेलणार?

भोसरी विधानसभेचे ‘धनुष्य’ कोण पेलणार?

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 09 2018 1:11AMपिंपरी ः संजय शिंदे

वर्षभरावर लोकसभा निवडणुका येऊ ठेपल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाएकत्र होणार की स्वतंत्र याबाबत साशंकता आहे. दरम्यान बुधवारी (दि. 6) युतीसंदर्भात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रमुखांमध्ये बैठक पार पडल्याने युती होणार की नाही याबाबत चर्चेला ऊत आला आहे. भोसरी विधानसभेसाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे; परंतु शिवसेनेमध्ये विधानसभेचे धनुष्य कोण पेलणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पक्षातीलच की ऐन वेळी  इतर पक्षातील स्थानिकाला उमेदवारीसाठी पायघड्या पांघरल्या जाणार याबाबत शिवसेनेंतर्गत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

शिरुर लोकसभेचे शिवसेनेकडून खा. शिवाजीराव आढळराव-पाटील नेतृत्व करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीला भोसरी मतदारसंघातून इतर पक्षाच्या उमेदवारांपेक्षा मोठ्या फरकाने आढळरावांना मत्ताधिक्क्य मिळते; परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र पक्षाच्या उमेदवाराला तेवढे मतदान होत नसल्याने पराभवास सामोरे जावे लागते हे शल्य शिवसैनिकाच्यात आहे. 2009 च्या निवडणुकींमध्ये शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांना अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्याकडून अवघ्या बाराशे मतानी तर 2014 मध्ये भाजपा आणि शिवसेना वेगवेगळे लढल्यानंतरही दुसर्‍या क्रमांकाची मते घेत अपक्ष उमेदवार महेश लांडगे यांच्याकडून पराभवास समोरे जावे लागले होते. 

युती झाली किंवा नाही तरीही शिरुर लोकसभेसाठी विद्यमान खा. आढळराव शिवसेनेकडून तिसर्‍यांदा निवडणुकीला समोरे जाणार आहेत. तसेच भाजपाकडून भोसरीचे सहयोगी आ. महेश लांडगे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भवितव्य युतीवर अवलंबून आहे. युती झाली तर हा मतदारसंघ शिवसेनेला की भाजपाला याबाबत पून्हा संघर्ष आहेच. 2004, 2009 युतीच्या काळात हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. 2014 मध्ये भाजपा आणि शिवसेना वेगवेगळे लढल्यामुळे दोन्ही पक्षाकडून उमेदवार लढले होते.

युतीबाबात साशंकता असल्यामुळे भोसरी विधानसभेसाठी शिवसेना, भाजपाने तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडे सुलभा उबाळे सोडल्यास तेवढा सक्षम उमेदवार सध्या पक्षात नाही. त्यामुळे पुन्हा उबाळेच की स्थानिक उमेदवार की जे गावकी-भावकीबरोबरच पै-पाहुण्यांच्या राजकारणाचा प्रभाव असणार्‍या समाविष्ट गावातील माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, किसन महाराज तापकीर यांच्यासह मनपा निवडणुकींमध्ये लढलेल्या शिवसैनिकाला उमेदवारी देणार की ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संपर्कात असणार्‍या तगड्या पदाधिकार्‍यांला पायघड्या घालणार याकडे शिवसैनिकासह शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.