होमपेज › Pune › आईची करणी उतरविण्याच्या बहाण्याने तरुणीसोबत लग्न

करणी उतरविण्याच्या बहाण्याने तरुणीसोबत लग्न

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

मानसिक आजाराने त्रस्त आईवर करणी झाल्याचे सांगून ती करणी काढून मुलीमध्ये टाकण्याचा; तसेच आजार बरा करण्याच्या बहाण्याने राजू आप्पा साळवे (वय 42, रा. घोरपडे पेठ, पुणे) या भोंदूबाबाने उच्चशिक्षित तरुणीसोबत मंदिरात लग्न करून तिला शरीरसंबंधांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा भोंदूबाबा इलेक्ट्रॉनिक्सची कामे करतो. तरुणीला संशय येताच तिने पोलिसांकडे धाव घेतल्याने या भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे. दरम्यान, पसार होण्याच्या तयारीत असणार्‍या भोंदूबाबाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.  याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी उच्चशिक्षित आहे. तिची आई मानसिक रुग्ण असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, तरीही त्यांचा आजार बरा होत नव्हता. दरम्यान, आरोपी राजू आप्पा साळवे इलेक्ट्रॉनिक्सची कामे करतो. फॅन दुरुस्तीसाठी तो तरुणीच्या घरी आला होता. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या भावाला आईवर कोणी तरी करणी केली आहे. 

करणी काढून ती तरुणीमध्ये टाकावी लागेल, त्यानंतर आई बरी होईल असे सांगितले. तरुणीच्या परत घरी येऊन गहू एका पाटावर ठेवले. त्यावर बोट ठेवून मंत्रोपचार केले. आईचे लग्न झाल्यापासून त्यांच्यावर कोणी तरी करणी केल्याचे सांगितले. मी मांत्रिक असून, आईचा आजार शंभर टक्के बरा करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर करणी काढण्यासाठी म्हणून फिर्यादी, त्यांचा भाऊ आणि आई-वडील, इतर नातेवाईकांना मांढरदेवी येथे नेले.

दर्शन घेऊन परत आल्यानंतर उद आण्यासाठी म्हणून 2 हजार रुपये घेतले. उद आणल्यानंतर घरात त्याचा धूर करून मंत्रोपचार केले. पुन्हा मांढरदेवी येथे नेले. परत येताना वाई येथील  मंदिरात नेऊन त्याठिकाणी सर्वांना कुंकू लावत मंत्रोपचार केले. घरी परतल्यावर आणखी साडेतीन हजार रुपये घेतले. त्यानंतर दोन लिंबू, काळ्या बाहुल्या, काळ्या रंगाचे उडीद, फुले व इतर साहित्य घेऊन आला. तरुणीला एका गोल रिंगणात बसवले व तिला आईची करणी माझ्या अंगात येऊ दे, असे म्हणण्यास सांगितले. एवढेच नाही तर पुढे तक्रारदार यांना सुवासिन व्हावे लागेल म्हणून हिरवे कपडे घालून मांढरदेवीला नेले. तेथून परत येताना देवाशी लग्न करावे लागेल असे सांगितले. काही वेळाने मीच देव असल्याचे सांगून एका मंदिरात तरुणीला मंगळसूत्र घातले; तसेच कुंकू लावून लग्न केले. 

दोघांचे लग्न झाल्याचे कोर्‍या कागदावर लिहून घेतले. त्यानंतर तरुणीकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. त्यामुळे तरुणी गोंधळून गेली. आई बरी होईना. तसेच, हा मांत्रिक  मानसिक आजार बरा करू शकत नसल्याचे समजले. त्यामुळे शेवटी या विरोधात खडक पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, साळवे हा पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. अधिक तपास खडक पोलिस करीत आहेत.


  •