Sun, Jul 21, 2019 16:33
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ‘भीमाशंकर’ला सर्वोत्तम कारखान्याचा पुरस्कार

‘भीमाशंकर’ला सर्वोत्तम कारखान्याचा पुरस्कार

Published On: Aug 28 2018 1:36AM | Last Updated: Aug 28 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे हंगाम 2017-18 मध्ये उल्लेखनीय कार्यक्षमतेबद्दल देण्यात येणार्‍या पुरस्कारांची घोषणा झालेली आहे. त्यामध्ये देशपातळीवरील एकूण 19 पारितोषिकांपैकी सर्वाधिक 9 पुरस्कार महाराष्ट्रातील  कारखान्यांनी पटकावून देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश 4, हरियाणा 3 पारितोषिके मिळवून अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानावर आहेत. गुजरात, तामिळनाडू व मध्यप्रदेश राज्याला प्रत्येकी एका पारितोषिकावर समाधान मानावे लागले आहे, अशी  माहिती महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

देशातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्याचा ‘कै. डॉ. वसंतदादा पाटील पुरस्कार’ पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास (पारगाव, ता. आंबेगाव) जाहीर झालेला आहे. तसेच सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्याच्या उच्च उतारा विभागात सोनहिरा सहकारी साखर कारखाना, जिल्हा-सांगली यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असून इतर विभाग गटांतील प्रथम क्रमांक किसान सहकारी चिनी मिल नजिबाबाद (उत्तर प्रदेश) यांना जाहीर झालेला आहे.    

दरवर्षी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे देशभरातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यात येते व ते केंद्र सरकारच्या मुख्य साखर प्रबंधकांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येते. त्यानुसार समितीकडून पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून दिल्ली येथे 10 सप्टेंबर रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान, केंद्रीय अन्न राज्यमंत्री सी. आर. चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. स्मृतिचिन्ह  व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे त्यांनी सांगितले.

या समितीसमोर देशभरातून एकूण 83 सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्या तांत्रिक, प्रक्रिया, वित्त, ऊस उत्पादकता व एकूण व्यवस्थापन या बाबींची माहिती व आकडेवारी सादर केलेली होती. साखर उतारा व उर्वरित विभाग अशा दोन भागांत पारितोषिकांची विभागणी करण्यात येते. त्यानुसार आर्थिक वर्ष 2017 ते 2018  साठी विभागनिहाय पारितोषिकविजेते पुढीलप्रमाणे आहेत.

ऊस उत्पादकता पुरस्कार ः  उच्च उतारा विभाग-प्रथम क्रमांक ः (1) क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड कारखाना, सांगली.  द्वितीय क्रमांक ः (2) पद्मश्री क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर कारखाना, सांगली. (3) इतर विभाग- प्रथम क्रमांक ः कर्नाल कारखाना, हरियाणा.  द्वितीय क्रमांक ः (4) गंगा किसान चिनी मिल, मोर्णा,उत्तर प्रदेश.

तांत्रिक नैपुण्य पुरस्कार ः  उच्च उतारा विभाग-प्रथम क्रमांक ः (1) श्री विघ्नहर कारखाना जुन्नर, जिल्हा पुणे. द्वितीय क्रमांक ः (2) श्री पांडुरंग कारखाना, श्रीपूर, जिल्हा-सोलापूर. (3) इतर विभाग-प्रथम क्रमांक ः शहाबाद कारखाना, हरियाणा.  द्वितीय क्रमांक ः (4) हाफेड शुगर मिल, कर्नाल, हरियाणा.

वित्तीय व्यवस्थापन पुरस्कार ः उच्च उतारा विभाग - प्रथम क्रमांक (1) सह्याद्री कारखाना, कराड, जिल्हा-सातारा.  द्वितीय क्रमांक  (2) श्री नर्मदा खांड उद्योग, जिल्हा नर्मदा, गुजरात. इतर विभाग - प्रथम क्रमांक (1) कल्लाकुर्ची कारखाना, तामिळनाडू. द्वितीय क्रमांक (2) नवलसिंग कारखाना, बुर्‍हाणपूर, मध्यप्रदेश. 

उच्चांकी ऊस गाळप ः उच्च उतारा विभाग-प्रथम क्रमांक (1) विठ्ठलराव शिंदे  कारखाना,माढा, जिल्हा सोलापूर. इतर विभाग-प्रथम क्रमांक (2) सरजू सहकारी चिनी मिल, बलरायन, उत्तर प्रदेश.

उच्चांकी साखर उतारा ः उच्च उतारा विभाग-प्रथम क्रमांक (1) कुंभी कासारी, जिल्हा कोल्हापूर. इतर विभाग- प्रथम क्रमांक (2) किसान सहकारी चिनी मिल, गजरौला-उत्तर प्रदेश.