Thu, Sep 20, 2018 20:11



होमपेज › Pune › श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता

श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता

Published On: Mar 01 2018 1:53AM | Last Updated: Mar 01 2018 1:42AM



पुणे : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरणस्नेही विकास करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा 148.34 कोटींचा विकास आराखडा जिल्हाधिकार्‍यांनी 10 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीला सादर केला होता. त्याला बुधवारी शिखर समितीने मान्यता दिली असून, 31 मार्च 2021 पर्यंत आराखड्यातील सर्व कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांवर सोपवण्यात आली आहे.

श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असून, त्यास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. येथे दरवर्षी साधारणत: 25 लाख भाविक दर्शनासाठी येतात, हे लक्षात घेऊन देवस्थानचा पर्यावरणस्नेही विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आराखड्यातील प्रस्तावित 11 कामे तीन टप्प्यांमध्ये 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण करायची असून, सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. भीमाशंकरचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून, वन्यजीव अभयारण्य म्हणून राखीव वनात मोडतो. त्यामुळे आराखड्यातील ज्या विकासकामांना भारतीय वनसंवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत मान्यता घेण्याची गरज आहे, ती सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी घ्यायची आहे.

आरखड्यातील कामे करताना ज्या खाजगी जमिनी संपादित करावयाच्या आहेत, त्यासंबंधीचे मालकांचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. तसेच  भीमाशंकर येथील बसस्थानकाचे नूतनीकरण करताना त्यासाठी उत्तम वास्तुविशारद नेमण्यात यावा. आराखड्यातील ज्या कामांना कुंपण भिंत आहे त्या भिंती बोलक्या केल्या जाणार आहेत. ज्योतिर्लिंगाचे महत्त्व, वन, वृक्ष आणि वन्यजीव संपदा याची माहिती, स्वच्छतेचे संदेश त्यावर देण्यात येणार आहेत. देवस्थानला 2030 मध्ये येणार्‍या भाविकांची संख्या विचारात घेऊन आराखड्यातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारणाच्या सुविधा, वाहनतळ विकास, आरोग्य केंद्राचे काम, तसेच स्वच्छतेच्या सुविधा यांचा विकास केला जाणार आहे.

होणारी विकासकामे आणि आर्थिक तरतूद 

सामूहिक सेवा केंद्र, प्रवेशद्वार, पायरी मार्ग, सार्वजनिक शौचालय, हेलिपॅड, काँक्रिट रस्ते, परिसर सुधारणा, सीमाभिंत, पोलिस स्टेशन इमारत, दुकान गाळे, चप्पल स्टँड, सल्लागार शुल्क, भीमा नदी उगमस्थानाजवळील परिसराचे सुशोभीकरण इ. तसेच वनेतर वापरासाठीचा खर्च आणि खासगी जमीन भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी 63.06 कोटींची तरतूद करण्यात आली. पथदिवे, सीसीटीव्ही, डिजिटल डिस्प्ले, साउंड सिस्टिम, अग्नी प्रतिबंधक उपाययोजना, पायरी मार्ग येथील विद्युतीकरण आणि प्रकाश व्यवस्थेवर 7.17 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. मुख्य मंदिर संंवर्धन, नवीन दगडी मंडप बांधकाम, सीमाभिंत, सर्व तीर्थ व मोक्षकुंड जतन संवर्धन, उर्वरित 4 कुंड आणि जलमार्गाचे सुशोभीकरण, भाविकांसाठी पाय धुण्याची व्यवस्था, दगडी पायर्‍यांसाठी 34.97 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना, घनकचरा आणि मलनिस्सारणाचे काम करण्यासाठी 9.69 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. भूमिगत केबल, रोहित्र आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या रूमसाठी 83 लाख रुपयांची तरतूद आहे. कोंढवळ तालावातून पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरणासाठी 19.95 कोटी, आरोग्य पथक इमारत बंधकाम, वाहनतळ, प्रीफॅब्रिकेटेड प्रसाधनगृह, सुरक्षा चौकी, बॅरिकेड्ससाठी 2.88 कोटी, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ युनिट बसविण्यासाठी 25 लाख रुपये, भाविकांसाठी 40 मिडी बसेस अतिरिक्त पुरवठ्यासाठी 4.75 कोटी, महादेव वन कामे, वन विश्रामगृह व एमटीडीसी कॉटेजेस परिसरातील कामे, वन क्षेत्रातील पायवाटांसाठी 4.52 कोटी रुपये, तर मोबाईल सेवा बळकटीकरणासाठी 30 लाख रुपये असा एकूण 148.37 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.