Mon, Jul 13, 2020 17:38होमपेज › Pune › कोण आहेत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे

कोण आहेत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे

Published On: Jan 03 2018 6:37PM | Last Updated: Jan 03 2018 6:37PM

बुकमार्क करा

पुणे: पुढारी ऑनलाईन

भीमा-कोरेगावमध्ये दोन गटात झालेल्‍या दगडफेकीच्या पाश्वर्भूमीवर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावे चर्चेत आली आहेत.  भीमा-कोरेगावात झालेल्या घटनेनंतर आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या बंद दरम्यान मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड आदी शहरांमध्ये दगडफेकीमुळे काही हिंसक घटना घडल्या. 

संभाजी भिडे
संभाजी भिडे गुरुजी हे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान या संस्थेचे प्रणेते आहेत. त्यांचे वय ८० वर्षे आहे. त्यांचे शिक्षण अनुभौतिक शास्त्र विषयात एम. एस्सी.पर्यंत झाले आहे. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापन केले आहे. काही काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. २०१६ आणि २०१७ मध्ये  त्यांचे अनुयायी हत्यारे घेऊन वारीमध्ये सहभागी झाल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. याप्रकरणी २०१७ मध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात त्यांच्यासह एक हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

मिलिंद एकबोटे
मिलिंद एकबोटे समस्त हिंदू आघाडीशी संबंधित आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यातील जिग्नेश मेवानी यांच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. एकबोटे यांच्यावर १९९० ते २०१५ याकाळात एकुण ३६ गुन्हे दाखल आहेत. त्यातील १८ गुन्हे प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्यामुळे दाखल आहेत. ५६ वर्षीय एकबोटे हे पुण्यात याआधी भाजप नगरसेवक म्हणून कार्यरत होते. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा भाजप नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून आले. २००२ मध्ये तिकीट नाकारल्यावर त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २००७ मध्ये हिंदू एकता मंच या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास विरोध केला होता. त्यावेळी एकबोटे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले होते.