Mon, Jun 24, 2019 21:00होमपेज › Pune › मेवाणीने 'लाल सलाम' न म्हणता 'जय भीम' म्हणावे: आठवले

मेवाणीने 'लाल सलाम' न म्हणता 'जय भीम' म्हणावे: आठवले

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 26 2018 9:59AMपुणे : प्रतिनिधी

वढू येथे 29 डिसेंबरला घडलेल्या प्रकारानंतर 1 जानेवारीला कोरेगाव भीमा, सणसवाडी येथे पोलिसांनी ‘बंद’ला परवानगी का दिली. त्या दिवशी ‘बंद’ काळात निघालेल्या जमावाला पोलिसांनी जागेवर रोखायला पाहिजे होते; मात्र जमावाला पोलिसांनी न थांविबल्यामुळे हिंसाचार घडला. त्यामुळे हे सरकारचे नव्हे; पोलिसांचे अपयश आहे, असे मत सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.    

कोरेगाव भीमा प्रकरणावर आरपीआय पक्षाची (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) भूमिका स्पष्ट करण्यासाठी आठवले यांनी मंगळवारी सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते.

आठवले म्हणाले, कोरेगाव भीमा येथील हिंसाचार हा नियोजित होता; त्यामुळे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अटक झाल्यानंतर तत्काळ जामीन मिळू नये, यासाठी पोलिस पुरावे गोळा करत असून, दोघांनाही लवकरच अटक होणार आहे. दलित-मराठा वाद वाढविणे हे राज्याच्या हिताचे नाही. सणसवाडी येथील पवार कुटुंबीय आणि एमआयडीसीमध्ये काम करणारे सुमारे एक हजार कामगार आजही भीतीग्रस्त वातावरणात जगत आहेत. त्यांना सुरक्षा देण्यासंबंधी मी पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांसोबत चर्चा केली आहे. त्यांना सुरक्षा पुरवली जाईल, असे आठवले यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचे काहीजण राजकारण करीत आहेत. यामुळे दोन समाजांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असून, ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांनी 2019 मध्ये करावे, असे सांगत पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होणार असल्याचे भाकीत आठवले यांनी वर्तविले आहे. गावातील गरिबी हटवायची असेल आणि शहरात येणारे लोंढे रोखायचे असतील तर फक्त दलित व्यक्तीलाच नाही; तर गावामध्ये वास्तव्य करणार्‍या प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला जमीन दिली पाहिजे, असे आठवले यांनी सांगितले.

रिपब्लिकन ऐक्याविषयी आठवले म्हणाले, मी अजूनही ऐक्यासाठी प्रयत्नशील आहे. येणार्‍या निवडणुकीत दलितांतील प्रतिनिधींना सत्तेत जायचे असेल, तर ऐक्य होण्याची गरज आहे. त्यासाठी एक सूत्र ठरवून घ्यायला हवे. कोणाच्याही नेतृत्वाखाली काम करायला आपण तयार आहोत. संविधानाला ग्रंथ मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत; त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्‍नच येत नाही. संविधानाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्यासाठी मी दिल्लीत बसलेलो आहे, असेही आठवले यांनी सांगितले. 

जिग्नेशने जय भीम म्हणावे गुजरातचा आमदार जिग्नेश मेवाणी नक्षलवादाकडे जाणारा नाही. युद्धाकडून बुद्धाकडे जाणारा खरा आंबेडकरवादी होय. नक्षलवादी होऊन कुठल्याच व्यक्तीचे आजवर भले झालेले नाही; त्यामुळे नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. आम्ही त्यांना आमच्या पक्षात सहभागी  करून घेऊ, त्यांना निवडणुकीचे तिकीट देऊ. निवडून आणून मंत्रिपदही देऊ; त्यामुळे जिग्नेश मेवाणीने नक्षलवाद्यांच्या नादाला लागू नये. मेवाणी हा आंबेडकरवादी असेल, तर त्याने लाल सलाम न म्हणता जय भीम म्हणावे.