Sat, Mar 23, 2019 16:53होमपेज › Pune › मिलिंद एकबोटेंना दुसर्‍या गुन्ह्यातही जामीन 

मिलिंद एकबोटेंना दुसर्‍या गुन्ह्यातही जामीन 

Published On: Apr 19 2018 2:14PM | Last Updated: Apr 19 2018 2:15PMपुणे : प्रतिनिधी 

कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनी झालेल्या जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे ( वय 61, रा. शिवाजीनगर) यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश  एस. एम. मेनजोगे यांच्या न्यायालयाने विविध अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यानंतर त्यांना दुसर्‍या गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मंगळवारी (दि.17) सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर गुरूवारी (19 एप्रिल) जामीनावर निर्णय राखून ठेवण्यात आला होता.   

1 जानेवारी 2018 ला शौर्य दिनानिमित्त वंदन करण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारो आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमा येथे आले होते. त्यावेळी कोरेगाव-भीमा गावच्या हद्दीत उसळलेल्या दंगलीमध्ये दगडफेक, जाळपोळीची घटना झाली. यामध्ये 92 दुचाकी, 92 चारचाकी वाहने, चार रिक्षा, 14 टॅम्पो, दुकाने, हॉटेल्स सरकारी, खासगी वाहनांची तोडफोड झाली होती. त्यामध्ये सर्व मिळून सुमारे 5 कोटी 94 लाखांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अ‍ॅट्रॉसिटी कलमानुसार शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात एकबोटे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्या प्रकरणात त्यांना जामीनही मिळाला आहे.  

शिक्रापूर पोलिस ठाण्यात खुनाचा, प्रयत्न, तोडफोड प्रकरणात त्यांना पुन्हा अटक केली होती. यामध्ये एकबोटे न्यायालयीन कोठडीत होते. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. एस.के.जैन आणि अ‍ॅड. अमोल डांगे यांनी त्यांच्या जामिसाठी अर्ज केला आहे. यावर सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार तर साक्षीदाराच्या वतीने अ‍ॅड. तौसिफ शेख, अ‍ॅड. कुमार कलेल यांनी जामीनाला विरोध केला होता.

एकबोटेंना यापूर्वी अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जामीन 
कोरेगाव भिमा प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात विशेष न्यायालयाने एकबोटेंना शर्तीचा भंग न करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना पोलिसांकडे पासपोर्ट जमा करण्यास सांगण्यात आले आहे. सुरू असलेला मोबाईल नंबर पोलिसांना देण्याचे व पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. त्याबरोबरच पत्रकार परिषद न घेणे, सभा न घेणे, सभेत भाषण न करणे, दर सोमवारी शिक्रापूर पोलिस ठाण्यात हजेरी लावणे, न्यायालयाच्या पूर्व परवानगी शिवाय भारत सोडून न जाण्याच्या अशा विविध अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अटी शर्तींचा भंग झाल्यास जामीन रद्द करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

Tags : Bhima Koregaon Violence, Milind Ekbote,  Pune Court