Sun, Aug 25, 2019 12:50होमपेज › Pune › भीमा कोरेगाव प्रकरण : ‘सीसीटीव्ही’दिसणार्‍यांवर कारवाई

भीमा कोरेगाव प्रकरण : ‘सीसीटीव्ही’दिसणार्‍यांवर कारवाई

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 21 2018 12:24AMकोरेगाव भीमा : प्रतिनिधी 

कोरेगाव भीमा येथील दंगलीत जे कोणी ‘सीसीटीव्ही’ दिसतात  अशा व्यक्तींवरच फक्‍त कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांचे आर्थिक नुकसान या दंगलीत झाले आहे अशांच्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले असून, कोरेगाव भीमातील नुकसान साधारणतः 10 कोटी 50 लाख रुपयांच्या घरात आहे. या नुकसानग्रस्तांना शासनाच्या वतीने लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. 

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत कार्यालयात कोरेगाव भीमा ग्रामस्थ, पोलीस व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांसाठी आयोजित चर्चेत ते बोलत होते. यावेळी शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले, अतिरिक्‍त पोलिस निरीक्षक तेजस्वी सातपुते, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी म्हणाले की,  पंचनाम्यासाठी पोलिसांचे एक व महसूल विभागाचे एक पथक तयार करण्यात आले आहे. ज्या नागरिकांची वाहने जळाली असतील त्यांनी गाडीच्या संदर्भातील कागदपत्रे, इन्शुरन्सचे पेपर महसूल विभागाच्याअधिकार्‍यांकडे जमा करावेत. जर काही वाहनांची कागदपत्रे नसतील तर अशा नागरिकांसाठी पुणे प्रादेशिक विभागाचे अधिकारी उपलब्ध करून देण्यात येतील. असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, जे कोणी दंगलीसाठी दोषी असतील फक्त अशाच लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी परिस्थितीजन्य पुरावे पाहण्यात येणार आहेत. 

कोरेगाव भीमाचे माजी सरपंच विठ्ठल ढेरंगे यांनी   गावातील नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. सध्या परिस्थिती शांत असून, गावाची काही कारण नसताना मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. गावातील कोणत्याही निष्पाप मुलांवर कारवाई होता कामा नये, अशी मागणी यावेळी नारायण फडतरे यांनी केली. 

जिल्हाधिकार्‍यांना महिलांचा घेराव 

ग्रामपंचायत कार्यालयातील बैठक संपवून जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणा बाहेर आल्यानंतर त्यांना गावातील महिलांनी घेराव घालून आपल्या व्यथा मांडल्या. आमच्या मुलांवर कोणतीही विनाकारण कारवाई होऊ नये. जे दोषी असतील फक्त अशांवरच कारवाई व्हावी.  पोलीस प्रशासनाने पुरावे पाहूनच मुलांची चौकशी करावी, असे आवाहन महिलांनी या वेळी केले. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव व अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी महिलांच्या शंकांचे निरसन केले.