Tue, Mar 19, 2019 15:34होमपेज › Pune › कोरेगाव-भीमा दंगलीत साडेनऊ कोटींचे नुकसान

कोरेगाव-भीमा दंगलीत साडेनऊ कोटींचे नुकसान

Published On: Jan 11 2018 1:28AM | Last Updated: Jan 10 2018 11:50PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी    

कोरेगाव-भीमा आणि परिसरात 1 आणि 2 जानेवारीला उसळलेल्या दंगलीत सुमारे 9 कोटी 48 लाख 55 हजार 765 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या दंगलीत खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे शिरूर येथील नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील पथकाने केले. 

या पथकात महसूल विभागाचे मंडल अधिकारी, ग्रामसेवक आणि पोलिस प्रशासनाच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या पथकाने 169 ठिकाणी पंचनामे करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.

दंगलीमध्ये मोठी जाळपोळ आणि दगडफेक झाली. या घटनेनंतर नुकसानीचे पंचनामे तयार करण्यासाठी पथके तयार करण्यात  आली होती. जमावाने केलेल्या प्रत्येक नुकसानीची माहिती घेऊन हे सविस्तर पंचनामे बनविण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

नुकसान झालेल्या मालमत्ता

दंगलीत 88 चारचाकी, 67 दुचाकी आणि एक तीनचाकी वाहनाचे नुकसान झाले. तर, 14 घरे, 63 हॉटेल्स आणि 5 गॅरेजचे नुकसान झाले आहे. कोरेगाव-भीमामध्ये एकूण 169 पंचनामे करून नुकसानीची आकडेवारी निश्चित करण्यात आली आहे. सणसवाडी येथे चारचाकी 28, दुचाकी 28, बस 3, ट्रक 8, तीनचाकी 4, जेसीबी एक आणि अग्निशामक दलाची गाडी यांचे नुकसान झाले आहे. तर चार घरांचे नुकसान झाले आहे. 13 दुकाने आणि 6 हॉटेल्सचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

केवळ स्थानिक वाहनांचे पंचनामे

एक जानेवारीला कोरेगाव-भीमा येथे उसळलेल्या दंगलीत स्थानिकांसह अभिवादनासाठी आलेल्या लोकांच्या वाहनांवर दगडफेककरण्यात आली होती. यामध्ये शेकडो वाहनांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र, त्यात केवळ स्थानिक वाहनांचा समावेश आहे. तोडफोड झालेली अनेक वाहने आपापल्या गावी परतली आहेत. त्यामुळे त्या वाहनांचे पंचनामे होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.