पुणे : प्रतिनिधी
कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार असलेले मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांना तात्काळ अटक करावी, तसेच त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करावी या मागणीसाठी भीम आर्मी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन केले.
एकबोटे आणि भिडे या दोन्ही व्यक्ती समाजास घातक असून अनेक दंगलींमध्ये त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतो. या दोन्ही व्यक्ती समाजाच्या स्वास्थ्याला बाधक असून चुकीचा व खोटा इतिहास सांगून समाजाचे संतुलन बिघडवतात.
जाती-धर्मात द्वेष निर्माण करणे दलित, मुस्लिम समाजावर हल्ले करण्यास प्रवृत्त करणे, अशी देश विघातक कृत्य त्यांच्याकडून सातत्याने होतात. महापुरुषांना बदनाम करण्याचे काम या दोघांनी वारंवार केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेतर्फे यावेळी प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.