Sun, May 31, 2020 19:45होमपेज › Pune › मुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले

मुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले

Published On: May 06 2018 1:54AM | Last Updated: May 06 2018 1:26AMभिगवण : प्रतिनिधी

अतिशय क्रूरपणे खून केलेले म्हणजे मुंडके, हात-पाय छाटलेले अंदाजे 25 ते 30 वर्षीय तरुणीचे धड भिगवण पोलिसांना शनिवारी (दि. 5) मिळून आले आहे. बारामती-नगर मार्गावरील जुने भिगवण येथील पुलाजवळ पाण्यात हे धड मिळून आले असून, या गूढ खुनाचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, बारामतीचे विभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. 

जुने भिगवण येथील पुलापासून जवळच अंतरावर मुंडके, दोन्ही वेगवेगळे हात, मानेपासून खालचा ते कंबरेवरील धड असे शरीराचे अवयव असणारा मृतदेह असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यावरून भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक नीलकंठ राठोड, बी. एन. पवार, अनिल सातपुते, रमेश भोसले, श्रीरंग शिंदे, गोरख पवार, नवनाथ कदम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.

हे धड पाण्याबाहेर काढल्यानंतर इंदापूर येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन व इतर वैद्यकीय तपासण्यासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर सदरचे मिळून आलेला शरीराचा अवयव हा स्त्री जातीचा व 25 ते 30 वयोगटातील असल्याचे पुढे आले आहे. डॉ. संदीप पखाले, बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेच्या तपासासाठी तीन पथके वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली आहेत. मुळात कोणताही पुरावा मागे ठेवण्यात आला नाही. तसेच ओळख पटण्यासारखेही काही नसल्याने या खुनाचा तपास लावणे भिगवण पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, भिगवण पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलकंठ राठोड यांनी सांगितले.