Sun, Mar 24, 2019 12:28होमपेज › Pune › भिडे गुरुजी अडचणीत

भिडे गुरुजी अडचणीत

Published On: Jun 12 2018 1:46AM | Last Updated: Jun 12 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी

‘माझ्या शेतातील आंबे 180 पेक्षा जास्त जोडप्यांना खायला दिले. त्यापैकी दीडशे जोडप्यांना मुले झाली आहे. आंबे खाल्ल्याने ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होतो’ हे विधान संभाजी भिडे गुरुजी यांनी नाशिक येथे रविवारी एका जाहीर सभेत केल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. 

भिडे गुरुजींचे हे विधान ‘गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व लिंग निवड प्रतिबंध कायदा’ (पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट)चा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी कुटुंब कल्याण विभागाकडे केली आहे. तर हे विधान म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखे असून, त्यांच्यावर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी ‘अंनिस’चे राज्य सचिव मिलिंद देशमुख यांनी केली आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचे ‘आंब्या’चे विधान माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका करण्यात येत आहे. भिडे गुरुजी हे अप्रत्यक्षपणे त्यांच्या शेतातील आंबा खाल्ल्याने मुलगा  होईल याचा प्रचार करत आहेत. त्यामुळे मुलींचा जन्मास कोठेतरी कमी लेखले जात आहे. त्यामुळे हे विधान वादात सापडले आहे.  

पाठीशी घातल्यास गुन्हा

तक्रारीमध्ये भिडे गुरुजी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे तक्रारदाराने अतिरिक्‍त संचालक पाटील यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अन्यथा आपणास दिलेली पंधरा दिवसांची नोटीस आहे, असे समजण्यात यावे आणि पंधरा दिवसांच्या आत कारवाई करावी. कारवाई न केल्यास आपण त्यांना पाठीशी घालत आहात म्हणून आपणांविरुद्ध योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे तक्रारदार बोर्‍हाडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.