Thu, Jul 18, 2019 21:56होमपेज › Pune › ‘राम-श्याम’वर शिक्षणाधिकारी मेहरबान

‘राम-श्याम’वर शिक्षणाधिकारी मेहरबान

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 12:00AMपुणे : गणेश खळदकर 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने मान्यता दिलेल्या शासनमान्य कै. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्या मंदिर या खासगी अनुदानित शाळेत लिपिक म्हणून एका भावाची नियुक्ती झालेली असताना त्याच्या जागेवर त्याचाच सख्खा भाऊ काम करीत आहे. या दोघा भावांनी मिळून शासनाची फसवणूक केली असल्याचा पर्दाफाश ‘दैनिक पुढारी’ने केला होता. त्यावर माध्यमिकचे उपसंचालक दिनकर टेमकर यांनी पिंपरी-चिंचवडचे प्रशासकीय अधिकारी बजरंग आवारी यांना शिक्षण क्षेत्रातील या राम-श्याम वर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, फसवणूक वेतन विभागाची झाली असून, त्यांनीच कारवाई करावी, असा अजब खुलासा आवारी यांनी शिक्षण उपसंचालकांना पाठवला आहे. त्यामुळे या दोघांवर शिक्षणाधिकारी मेहरबान असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.

शहरातील एका संस्थेकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे लिपिक पदासाठी महेंद्र नामदेव बामगुडे यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार हा प्रस्ताव मंजूर करीत या पदावर सन 2004 मध्ये महेंद्र नामदेव बामगुडे यांची नियुक्ती करण्यात आली. कै.श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेच्या हजेरी पुस्तिकेत शाळेचा मान्य लिपिक म्हणून महेंद्रचे नाव असूनही प्रत्यक्षात त्याच्या जागेवर काम करतो, सह्या करतो आणि पगार घेतो तो त्याचा भाऊ रवींद्र नामदेव बामगुडे. महेंद्र हा तापकीर शाळेमध्ये लिपिक म्हणून काम करणे अपेक्षित असताना तो मात्र पुणे महापालिकेच्या कै. संजय महादेव निम्हण शाळा क्र. 31 बी या शाळेत काम करीत आहे. 2004 पासून हा प्रकार सुरू असून, गेल्या 13 वर्षांमध्ये शिक्षण विभागाची कोट्यवधी रुपयांची लूट या दोन बंधुंनी केली आहे; परंतु याचे शिक्षण विभागाला गांभीर्य नसून शिक्षण विभागातील अधिकारी कारवाई करण्याचे सोडून केवळ कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानत आहेत.

माध्यमिकचे उपसंचालक दिनकर टेमकर यांनी 31 जानेवारी रोजी या दोन बंधुंवर एफआयआर दाखल करावा, असे बजरंग आवारी यांना कळवले होते. त्याला बजरंग आवारी यांनी 27 फेब्रुवारी रोजी या दोन बंधुंनी वेतन विभागाची फसवणूक झाली असून, प्राथमिकच्या वेतन अधीक्षकांनी एफआयआर करणे आवश्यक असल्याचा अजब खुलासा केला आहे, तर प्राथमिकचे वेतन अधीक्षक राजेंद्र साठे यांनी मान्यता देण्यात आल्यामुळेच वेतन देण्यात आले. त्यामुळे त्यांना वेतन किती देण्यात आले याची रक्कम सांगण्यात येईल. परंतु गुन्हा मात्र बजरंग आवारी यांनीच दाखल करणे गरजेचे असल्याचे सांगत हात झटकले आहेत. अधिकार्‍यांच्या या टोलवाटोलवीत राम-श्याम मात्र अद्याप मोकाटच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा गुन्हे दाखल करण्यासाठी घंटानाद आंदोलन करावे लागेल, असा इशारा मुख्य तक्रारकर्ते नवनाथ गारगोटे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते राजेश बेल्हेकर यांनी दिला आहे.

रवींद्र आणि महेंद्र तसेच संस्थाचालक यांनी मिळून वेतन विभागाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्राथमिकच्या वेतन अधीक्षकामार्फतच गुन्हा दाखल करावा लागणार आहे. तशा प्रकारचा खुलासा उपसंचालकांना दिला आहे. - बजरंग आवारी, शिक्षणाधिकारी, पिंपरी-चिंचवड 

आरोपींवर गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांचा गुन्हा दडपून टाकण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. यातून शिक्षण विभागातील अधिकार्‍यांचा पारदर्शी कारभार समोर येत आहे. संबंधित प्रकरणाबाबत जर लवकर निर्णय झाला नाही तर घंटानाद आंदोलनाबरोबरच मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार आहोत.  -राजेश बेल्हेकर, माहिती अधिकारी कार्यकर्ते