होमपेज › Pune › भाटघर धरणाच्या भिंतीला गळती

भाटघर धरणाच्या भिंतीला गळती

Published On: Feb 16 2018 1:51AM | Last Updated: Feb 16 2018 12:11AMसारोळा : वैभव धाडवे-पाटील

ब्रिटिशकालीन भाटघर धरणाच्या भिंतीला तीन वर्षांपासून गळती लागली आहे. याकडे कानाडोळा करणारे पाटबंधारे विभाग किती गावांचा जीव धोक्यात आणत आहे हे माहीत असूनही गळतीवर उपाययोजना अथवा आजपर्यंत कुठलीही पर्याप्त व्यवस्था केली नाही. संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी संबंधित भयभीत ग्रामस्थांकडून होत आहे.

भाटघर धरणाच्या वीज जनरेटर केंद्राजवळील दगडी भिंतीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. हजारो लिटर पाणी भिंतीतून वाया जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही गळती थोड्या प्रमाणावर होत होती, परंतु मागील दोन वर्षापासून गळतीचे प्रमाण  वाढल्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. गळती वाढत चालली आहे, अशा अवस्थेत पाटबंधारे अधिकारी भिंत फुटण्याची वाट पाहत बसलेत का? मग धोका लक्षात घेऊन याबाबत तातडीने अतिदक्षता घेऊन फक्त कागदोपत्री हालचाली झाल्या, ही दुर्दैवाची बाब आहे.

भाटघर धरणाची पहाणी जलसंपदा विभागाच्या नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या अधिकार्‍यांनी केली. अनेक अहवाल तयार झाले. दरवेळी कागदपत्रे रंगली, मात्र धरणाची भिंत सुरक्षित आहे का, याबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. 

भाटघर धरण 23.75 टीएमसी पाणीसाठा मर्यादेचे आहे. धरणाच्या भिंतीची लांबी 1 हजार 624 मीटर तर उंची 51 मीटर आहे. आतमध्ये छोटे धरण आहे. ब्रिटिशांनी बांधलेल्या या धरणांच्या उत्कृष्ट नमुन्यांचा अभ्यास महाराष्ट्रातील व देशातील धरणाच्या निर्मितीस झाला. नवीन धरणावर पाण्याचा दाब काहीशा प्रमाणात तीव्रता कमी होते. भाटघर धरणास 81 मोर्‍या असून त्यातील 45 मोर्‍या स्वयंचलित आहेत. धरणाच्या बांधकामाची सुरुवात 1913 मध्ये झाली आणि धरण पूर्णत्वास 1927 मध्ये आले. पूर्णक्षमतेने धरण 1928 मध्ये भरले.  या धरणाचे लाभक्षेत्र बारामती, इंदापूर, पुरंदर, फलटण, माळशिरस, अकलूज, खंडाळा, सोलापूर आदी तालुक्यांच्या शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या भाटघर धरणाची निर्मिती झाली.