Sat, Mar 23, 2019 12:45होमपेज › Pune › आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवी आता थांबेल का

आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवी आता थांबेल का

Published On: Sep 06 2018 1:42AM | Last Updated: Sep 06 2018 12:03AMपिंपरी : संजय शिंदे

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता येऊन दीड वर्षे पूर्ण झाले आहे. सत्ताधार्‍यांना आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत; परंतु अंतर्गत आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवी भूमिकेमुळे पक्षांतर्गत शह-काटशहाचे राजकारण आजमितीस सुरू असल्याची चर्चा पक्षीय गोटात असल्याचे प्राधिकरणाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या सत्कार कार्यक्रमात दिसून आले. त्यामुळे शहरस्तरावरील अंतर्गत कलहाचा  फटका 2019 च्या निवडणुकांवर होऊन द्यायचा नसेल तर सर्वच पदाधिकार्‍यांनी एकत्र बसण्याची वेळ आली आहे. 

पिंपरी-चिंचवड पालिकेवर कमळ फुलल्यानंतर पारदर्शक कारभार करण्यात येईल, असा दिंडोरा भाजपाकडून पिटण्यात आला होता; मात्र विरोधी पक्षांनी भाजपाच्या पदाधिकार्‍यांवर केलेले आरोप पाहता ते दिलेले वचन पूर्ण करण्यात कमी पडत असल्याचे दिसत आहे. विकास कामाच्या दुर्लक्षामुळे मेट्रोसाठी उभा करण्यात येत असलेल्या पिलरचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे इतर पिलर्सच्या दर्जाच्या बाबतीत ही साशंकता निर्माण झाली आहे. सत्ताधारी नगरसेवक, ठेकेदार, पदाधिकार्‍यांचे नातेवाईक यांच्यात ‘रिंग’द्वारे मलई वाटून घेण्यात धन्यता मानत असल्याने पारदर्शक कारभाराचे वचन पूर्ण करण्यात पालिकेतील सत्ताधारी कितपत यशस्वी होतात हे पाहण्याचे औचित्याचे ठरणार आहे.

पक्षांतर्गत वरवर दिसणारी एकी अंतर्गत खिळखिळी झाल्याचे पुन्हा सिद्ध झाले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ प्रदेश सदस्य सदाशिव खाडे यांची निवड करण्यात आली. त्यांना हे पद मिळू नये म्हणून पक्षातीलच काही जणांनी प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असताना त्यावर मात करुन खाडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने आणि लेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांच्या खंबीर साथीने  खेचून आणले. त्या अनुषंगाने खाडे यांचा शहरवासीयांच्या वतीने सन्मान करण्यात आला; मात्र  या कार्यक्रमाकडे शहरातील कारभार्‍यांनी व त्यांच्या बहुतांशी समर्थक नगरसेवकांनी पाठ फिरवली; परंतु खाडे यांची निवड पक्षाने केल्याने सर्वांनी उपस्थित राहायला पाहिजे होते, अशा अपेक्षा कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

2019 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने पावले उचलली आहेत; परंतु   शहराच्या राजकारणातील हेवीवेट नेते आझम पानसरे यांना विधान परिषद देण्यात येईल, असा शब्द पानसरे समर्थकांना मुख्यमंत्री यांनी दिला होता; मात्र महामंडळाच्या निवडीवरून पानसरे यांना विधान परिषदेवर संधी मिळेल का नाही याबाबत साशंकता असल्याने समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यामुळे भविष्यात पिंपरी-चिंचवड पातळींवर निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी शहर पातळीवरील आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवीला फाटा देत दोन्ही आमदार, खासदार, ज्येष्ठ पदाधिकारी यांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे.