Fri, Mar 22, 2019 05:41
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › गर्द हिरवाईने नटलेला भामचंद्राचा डोंगर

गर्द हिरवाईने नटलेला भामचंद्राचा डोंगर

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 10:07PMइंदोरी : ऋषिकेश लोंढे

जगद‍्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या देहूगाव व त्याजवळील भामचंद्र डोंगर पाहण्यास पावसाळ्यात नेहमी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. परमेश्वराच्या भेटीसाठी पंधरा दिवस तहानभूक विसरून तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचा धावा केला, ते ठिकाण म्हणजे भामचंद्राचा डोंगर किंवा भामगिरी. घोरवडेश्वर, भंडारा डोंगराप्रमाणेच भामचंद्र डोंगर ही अभंग लिहिण्याची तुकाराम महाराजांची प्रेरणास्थळे होती. या ठिकाणचा निसर्ग अनुभवण्यासाठी पुणे, मुंबई तसेच राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक तसेच पर्यटकांची गर्दी होते. 

भामचंद्र डोंगर तसा आडवाटेवरचा. एखाद्या तपस्वी मुनीप्रमाणे समाधी घेऊन एकांतात तपश्चर्या करीत बसलेला. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून तुटल्याने एकटा पडलेला व दाट झाडी असलेला डोंगर. डोंगरापर्यंत गर्द हिरवी झाडी व वरती सुमारे 800 ते 900 फूट कातळकडा आणि तोही उलट्या टोपीच्या आकाराचा. याच कातळात पुरातन गुहा आहेत.  देहू गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. देश विदेशातील पर्यटकांचा ओढा या तीर्थक्षेत्राकडे वाढला आहे. येथील शांत व सुंदर वातावरणामुळे तळेगावापासून जवळ असलेल्या; परंतु शांत, निसर्गरम्य ठिकाण म्हणून हे प्रसिद्ध आहे. देहूगावातील मुख्य मंदिरातून समोरच एक मोठा डोंगर दिसतो तो भंडारा डोंगर याच भंडारा डोंगराच्या समोर भामचंद्र डोंगर दिसतो. 

देहूगाव व आळंदीला जाऊन दर्शन घेणारे भाविक येथील भंडारा व भामचंद्र डोंगरावर गेल्यावाचून राहत नाही. देहूतून सुमारे 12 ते 13 किलोमीटरवर असलेल्या भामचंद्र डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत जाण्यासाठी पायवाट आहे. पायथ्यापासून 20-25 मिनिटातच आपण डोंगरावर पोचतो. उभी चढाई असल्याने थोडीशी दमणूक होते. पण थंडगार व स्वच्छ हवेमुळे थकवा पळून जातो. गर्द झाडीतला रस्ता संपवून छोटेसे पठार लागते. या पठावरावर दगडांनी बांधलेला चौथरा आहे. सातवाहन काळातील काही लेणी आहेत. पावसाळ्यात येथून धबधबा वाहतो. पहिल्या गुहेत शंकराचे मंदिर आहे. बाहेर सभामंडप व आत छोटे शिवलिंग आहे. गुहेबाहेर पिण्याच्या पाण्याचे टाकेही आहे. येथे वारकरी समाजातील साधक तुकाराम गाथेचे पठण करतात, तर काही विद्यार्थी इथ राहून संतपंरपरेचा अभ्यास करतात. जेमतेम एक माणूस वर किंवा खाली येऊ शकेल, अशा पद्धतीने दगडात पायर्‍या खोदून ठेवलेल्या आहेत.

एका बाजूला रेलिंगची सोय केल्यामुळे सर्वांना सहज मंदिरापर्यंत जाता येते. आतमध्ये विठ्ठल- रखुमाईच्या मूर्ती आहेत. पावसाळा सुरु झाला की, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात; तसेच पूर्व मावळ परिसरातील इंदोरी येथील भंडारा डोंगर, घोरावडेश्वर डोंगर आदी परिसरास विदेशी पर्यटकदेखील भेट देतात. जवळच असणारे देहूतील गाथा मंदिर, इंदोरी येथील भंडारा डोंगर, नानोली तर्फे चाकण येथील श्री फिरंगाई देवी डोंगर, जाधववाडी धरण परिसर, इंदोरीतील भुईकोट किल्ला, बिर्ला गणेश मंदिर, शिरगावचे साईबाबा मंदिर, घोरावडेश्वर, अयप्पा स्वामी मंदिर, इंदोरी येथील कुंडमळाचे रांजणखळगे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. पुणे-मुंबईकडून रेल्वेने यायचे झाल्यास तळेगाव दाभाडे रेल्वेस्थानकावर उतरून एसटी, अथवा खासगी वाहनाने तळेगाव- चाकण रस्त्यावरील संत जगनाडे महाराजांच्या सुदुंबरे या गावापर्यंत येऊन तेथून सात ते आठ किलोमीटरवर शिंदे-वासुली गावामध्ये भामचंद्र डोंगर आहे.