Mon, Nov 19, 2018 06:21होमपेज › Pune › भक्‍ती-शक्‍ती चौकातील ‘ग्रेडसेपरेटर’ आणि उड्डाणपुलाच्या कामास वेग

भक्‍ती-शक्‍ती चौकातील ‘ग्रेडसेपरेटर’ आणि उड्डाणपुलाच्या कामास वेग

Published On: Mar 09 2018 1:58AM | Last Updated: Mar 09 2018 1:29AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौक येथे ग्रेडसेपरेटर  व उड्डाणपूल बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. नियोजित पुलाच्या 17 पैकी 16 पिलरचे काम सुरू असून, 10 बांधून पूर्ण झाले आहेत. रोटरी (वर्तुळाकार) रस्त्याचे फाउंडेशनचे काम झाले आहे. प्राधिकरणाच्या बाजूकडील ग्रेडसेपरेटरच्या भिंतीचे काम 55 टक्के पूर्ण झाले आहे; तसेच प्राधिकरणाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे येणार्‍या पुलाच्या पिलरचे काम सुरू करण्यात आले आहे. 26 डिसेंबर 2019 पर्यंत ग्रेडसेपरेटर व उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार आहे.

निगडीतील भक्ती-शक्ती चौक येथे जुना मुंबई-पुणे रस्ता व प्राधिकरणाचा स्पाईन रस्ता एकत्र येत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. पुणे-मुंबई रस्त्यावरील वाहतुकीमुळे बरेच अपघात होत आहेत. सद्यःस्थितीमध्ये भक्ती-शक्ती ते मुकाई चौक हा ‘बीआरटीएस’ रस्ता विकसित करण्यात येत आहे. या रस्त्यावरील रावेत येथे लोहमार्गावरील पुलाचे कामही वेगाने चालू आहे. राष्ट्रीय महामार्गातर्फे देहूरोड ते निगडी या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. भक्ती-शक्ती चौकामध्ये ‘बीआरटीएस’चे टर्मिनल बांधण्याचे काम पूर्णत्वाकडे असून, निगडी-दापोडी ‘बीआरटीएस’ बससेवा सुरक्षित व्हावी यासाठी पालिकेने आयआयटी, पवई यांच्याकडून ‘सेफ्टी ऑडिट’ करून घेतले आहे.

न्यायालयाच्या परवानगीनंतर ‘बीआरटीएस’ बससेवा चालू करण्यात येणार आहे. हे सर्व मार्ग भक्ती-शक्ती चौक येथे एकत्र येत असून, भविष्यात सदर चौकामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. येथून जवळच वाहतूकनगरी, पीएमपीएमएल, चिखली-तळवडे आयटी पार्क येथे जाणार्‍या वाहनांचा  विचार करून सद्यःस्थितीतील वाहतूक व्यवस्थेमधील वाहनांची मोजणी करून, वाहनांची क्रॉसिंगची शक्यता पडताळून पाहिली जात आहे. कोठेही अपघात होणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे.  सदरचा चौक ‘सिग्नल फ्री’ करण्यात येणार आहे. 

शहराचे मानबिंदू असणारे भक्ती-शक्ती शिल्प समूहाचे सौंदर्य कुठेही कमी होणार नाही याची काळजी घेतली आहे. नियोजित उड्डाणपुलाचे ‘क्रॅश बॅरिअर’ हे भक्ती-शक्ती शिल्पाच्या तळाशी समपातळीमध्ये ठेवण्यात आले आहेत. यामुळे बसमधील प्रवाशांना पुलावरून शिल्पाचे दर्शन होईल. चौकामधून पादचार्‍यांना कुठेही वाहनांचा अडथळा होणार नाही, असे नियोजन आहे.

उड्डाणपूल-  पुणे मुंबई महामार्गाला समांतर, पूना गेट हॉटेल ते कृष्णा मंदिरापर्यंत जाणार्‍या व येणार्‍या वाहनांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र पूल उभारण्यात येत आहे. प्रत्येक पुलाची लांबी 849 मी., रुंदी 17.2 मी. उंची  8.5 मी. इतकी असेल.  प्राधिकरणाकडून पुणे-भोसरी व मुंबईकडे जाण्यासाठी प्राधिकरण हद्दीमधून स्वतंत्र पूल असेल.  लांबी 340 मी., रुंदी 8.5 मी. (2 लेन) व उंची 5.5 मी. असणार आहे. पुणे-मुंबई रस्त्याला समांतर उड्डाणपुलाखालून ‘बीआरटीएस’ टर्मिनल व पीएमपीच्या  डेपोकडून सर्व बसेस सहज धावतील. या उड्डाणपुलामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडणार असून, नाशिक फाटा उड्डाणपुलाप्रमाणे हा एक मानबिंदू होणार आहे. या कामासाठी सर्व सेवावाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी  20 कोटी व स्थापत्यविषयक काम करण्यासाठी सुमारे 105 कोटी असा एकूण 125 कोटी खर्च अपेक्षित आहे.