होमपेज › Pune › पालिकेच्या भाजी मंडई वापराविना पडून

पालिकेच्या भाजी मंडई वापराविना पडून

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 03 2017 11:51PM

बुकमार्क करा

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी भाजी मंडई उभारण्यात आल्या आहेत. मात्र, चुकीची जागा, पालिकेच्या भूमी-जिंदगी विभागाची  उदासीनता यामुळे यातील सांगवी, पिंपळे सौदागर, आकुर्डी, रामनगर, अजमेरा येथील भाजी मंडई  वापराविना पडून आहेत. साहजिकच भाजी मंडई बांधण्यासाठी पालिकेने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. या भाजी मंडईंच्या ठिकाणी काही गैरप्रकार झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न आहे.

सांगवी येथे गजानन महाराज मंदिरासमोर भाजी मंडईची उभारणी करण्यात आली. 80 गाळेधारकांना गाळ्यांचे वाटप करण्यात आले. मात्र, गाळ्यांचे भाडे थकल्याने; तसेच भाजी मंडईपेक्षा रस्त्यावर बसून  व्यवसाय चांगला होतो, अशी मानसिकता झाल्याने विक्रेते पुन्हा रस्त्यावरच बसून भाजी विक्री करू लागले. तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांच्या कार्यकाळात भाजी मंडई आकर्षक केल्यास विक्रेते तिथे बसतील, ग्राहकांचाही प्रतिसाद मिळेल, अशी मागणी पुढे आली. मात्र, आहे त्याच गाळ्यांचे भाडे थकले असताना हा प्रपंच नको, असे बंड यांनी सांगितले. या मंडई आज वापराविना पडून आहेत. 

पिंपळे सौदागर येथे 35 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भाजी मंडई वापराविना पडून आहे. जागेची कागदपत्रे ताब्यात नाहीत, अशा स्वरूपाची उडवाउडवी करत पालिकेचा भूमी-जिंदगी विभाग उदासीनता दाखवीत आहे. त्यामुळे सन 2012 मध्ये उभारण्यात आलेल्या या भाजी मंडईचा उपयोग पार्किंग, भंगार साहित्य ठेवण्यासाठी होत आहे. ही मंडई भिकार्‍यांचाही अड्डा बनली आहे. ही मंडई कार्यान्वित केल्यास शिवार चौक ते राजवीर सोसायटी येथील भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण कमी होईल, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

आकुर्डी येथे नाल्यावर बांधण्यात आलेल्या भाजी मंडईचीही अशीच दुरवस्था झाली आहे.  रामनगर येथे सन 2001च्या सुमारास 10 लाख रुपये खर्चून 12 गाळे बांधण्यात आले. मात्र, पालिकेच्या नाकर्तेपणामुळे भाजी मंडईच्या संकल्पनेस हरताळ फासला गेला आहे.अजमेरा-मासुळकर येथे फुटबॉल मैदानाशेजारी सुमारे 20 गाळे असलेली मंडई उभारण्यात आली. मात्र, ती जागा व्यवसायासाठी अयोग्य असल्याचे सांगत भाजीविक्रेत्यांनी या गाळ्यांकडे पाठ फिरविली आहे.