Thu, May 23, 2019 04:40होमपेज › Pune › सावधान !अनफिट स्कुलबस होणार जप्‍त

सावधान !अनफिट स्कुलबस होणार जप्‍त

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 12:27AMपुणे : प्रतिनिधी

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या अनफिट स्कुलबसवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आराखडा तयार केला आहे. त्यानुसार स्कुलबस तपासणीदरम्यान अनफिट बसेस जप्‍त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दै. ‘पुढारी’च्या ‘स्कुलबस चालकांच्या हातात चिमुरड्यांचे भवितव्य‘ अशा आशयाच्या बातमीची आरटीओेने दखल घेतली आहे.

आरटीओ प्रशासनाने वारंवार सूचना आणि आवाहन करुनही, स्कुलबस फिटनेस तपासणीला अनेकांकडून कोलदांडा दिला जात होता. त्यापार्श्‍वभुमीवर विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. पथकाद्वारे शहरातील विविध रस्त्यांवर धावणार्‍या स्कुलबसची तपासणी केली जाणार आहे. तसेच  शाळांमध्ये जाऊन स्कुलबस तपासणीला गती दिली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या स्कुलबसची पुर्नफिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे. स्कुलबस धोरणानुसार विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी नियमावली निश्‍चीत करण्यात आली आहे. त्यानुसार आरटीओकडून वाहनांची तपासणी करुन संबधित स्कुलबसला फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. 

रिक्षाचालकांवर करडी नजर

शहरतील मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक सर्रासपणे रिक्षातून केली जाते. विशेषतः टिळक रस्ता, डेक्कन, सदाशिव पेठ, नारायण पेठ, लक्ष्मी रस्त्यांवरील शाळेत रिक्षाप्रवासाला प्राधान्य दिले जाते. दरम्यान, एका रिक्षातून साधारणपणे 12 ते 15 छोट्या विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येत असल्याचे पाहणीत उघड झाले आहे. त्यामुळे अशा रिक्षा चालकांवर कारवाईसाठी विशेष कारवाई पथकांची करडी नजर राहणार आहे.