Tue, Jul 16, 2019 23:54होमपेज › Pune › ‘वैद्यकीय’च्या केंद्रीय कोट्यातील प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात

‘वैद्यकीय’च्या केंद्रीय कोट्यातील प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात

Published On: Jun 12 2018 1:46AM | Last Updated: Jun 12 2018 1:28AMपुणे ः प्रतिनिधी 

नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता वैद्यकीयच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. वैद्यकीय प्रवेशाच्या केंद्रीय कोट्यातील 15 टक्के जागांसाठी उद्यापासून (दि. 13) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दि मेडिकल काऊंसेलिंग कमिटी (एमसीसी)च्या वतीने नीट उत्तीर्ण उमेदवारांसाठी समुपदेशन सुरू करण्यात येणार असून उमेदवारांना 18 जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी आणि कॉलेजची पसंतीची माहिती भरावी लागणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया दोन फेर्‍यांमध्ये राबविली जाणार असून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी केवळ दोन संधी मिळणार आहेत. 

एमबीबीएस, बीडीएस यांसह विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय कोट्याअंतर्गत 15 टक्के जागांसाठी ‘एमसीसी’द्वारे ऑनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. 

या परीक्षेचा निकाल दि. 4 रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेतील गुणांच्या आधारेच राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित व खासगी विनानुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. यामध्ये एमबीबीएस व बीडीएससह बीएएमएस, बीयुएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएसस्सी (नर्सिंग), बीएएसएलपी आणि बीपी अँड ओ या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

दि मेडिकल काऊंसेलिंग कमिटीद्वारे देश स्तरावरील (ऑल इंडिया कोटा) 15 टक्के जागांसाठी समुपदेशन राबविले जाते. तर राज्याच्या कोट्यात येणार्‍या 85 टक्के जागांसाठी राज्य स्तरावर स्वतंत्रपणे समुपदेशन प्रक्रिया राबविते. केंद्रीय कोट्यातील 15 टक्के जागांसाठी विद्यार्थ्यांना 18 जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, केंद्रीय कोट्यातून न भरल्या जाणार्‍या जागा ही प्रवेश प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्याच्या कोट्यात वर्ग केल्या जाणार असून राज्याच्या प्रवेश प्रक्रियेनुसार या जागा भरल्या जाणार आहेत. 

वैद्यकीय प्रवेशाचे वेळापत्रक

पहिली फेरी 
दि. 13 ते 18 जून ः ऑनलाईन नोंदणी.
दि. 19 जून ः चलन भरण्याची शेवटची तारीख आणि पसंतीक्रम ठरवणे. 
दि. 20 ते 21 जून ः राऊंड 1 ची प्रक्रिया पार पाडणे. 
दि. 22 जून ः निवड यादी जाहीर करणे.  
दि. 23 जून ते 3 जुलै ः पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे.

दुसरी फेरी 

दि. 6 ते 8 जुलै ः नवीन ऑनलाईन नोंदणी. 
दि. 9 जुलै ः चलन भरण्याची शेवटची तारीख आणि पसंतीक्रम ठरवणे
दि. 10 ते 11 जुलै ः राऊंड 2 ची प्रक्रिया पार पाडणे. 
दि. 12 जुलै ः निवड यादी जाहीर करणे  
दि. 13 जुलै ते 22 जुलै ः पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे.
दि. 23 जुलै ः न भरलेल्या जागा राज्याच्या कोट्यात वर्ग होणार.