Thu, Apr 25, 2019 03:56होमपेज › Pune › पिंपरी पालिका भवनासमोर मेट्रोचे काम सुरू 

पिंपरी पालिका भवनासमोर मेट्रोचे काम सुरू 

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 10:59PMपिंपरी : प्रतिनिधी  

महारेल मेट्रो कॉर्पोरेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरही नुकतेच काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे चिंचवडच्या मदर तेरेसा उड्डाणपुल ते खराळवाडीपर्यंतचा सर्व्हिस रस्ता अरूंद झाला आहे. परिणामी, वाहतुक संथ होत आहे. त्यामुळे वाहनचालक वैतागले आहेत. 

महामेट्रोच्या वतीने दापोडीच्या हॅरिस पुल ते चिंचवडच्या मदर तेरेसा पुलापर्यंत मार्गिका उभारण्याचे काम वेगात असू आहे. पिंपरी-चिंचवड पालिका भवनासमोरील सर्व्हिस रस्त्यांवर   लोखंडी बॅरीकेटस लावून कामास सुरूवात केली आहे.  मोरवाडी चौकातील अहल्यादेवी पुतळ्यापासून ते पालिका बस थांब्याच्या अलिकडीपर्यंत बॅरिकेटस लावून काम सुरू करण्यात आले आहे. हा सुमारे 500 मीटरचा मार्ग अगोदर अरूंद असल्याने येथे पालिकेने बीआरटीएसचे बॅरिकेटस लावले नव्हते. मेट्रो कामांमुळे हा रस्ता आणखी अरूंद होऊन सर्व्हिस रस्ता वाहतुकीस अपुरा पडत आहे. केवळ एक बस जाईल इतकी जागा शिल्लक राहिल्याने वाहतुक संथ झाली आहे. विशेषत: वर्दळीच्या वेळी सकाळी व संध्याकाळी कोंडीत भर पडत आहे. 

एम्पायर पुल ते खराळवाडीपर्यंतचा मार्ग वाहतुक पोलिसांनी ‘नो पार्किंग झोन’ घोषित केला आहे. रस्त्यावर वाहन उभे केल्यास पोलिसांकडून दंड आकारला जात आहे. मात्र, काही ठिकाणी रिक्षा व इतर वाहने बिदिक्कतपणे थांबत असल्याने इतर वाहनांना अडथळा होत आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. परिणामी, वाहनचालक वैतागले आहेत.

पालिका, वाहतूक पोलिसांशी चर्चा करून काम सुरू

पालिका व वाहतूक पोलिसांसोबत चर्चा करून पालिका भवनासमोर मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे. मदर तेरेसा पूल ते खराळवाडी सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी ‘नो पार्किंग’ केले असून, फलक लावले आहेत. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. मेट्रोने प्रत्येक चौकात 2 वॉर्डन नियुक्त केले आहेत. वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून वाहतूक पोलिस व नागरिकांच्या सूचनेनुसार तत्काळ कारवाई केली जात आहे, असे पुणे मेट्रोचे ‘रिच वन’ प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले.

हे करायला हवे 

सर्व्हिस रस्त्यावर दुचाकी, रिक्षा, मोटारी, पीएमपीएल बस अशी सर्व प्रकाराची वाहने लावू न देणे. वॉर्डनऐवजी वाहतूक पोलिसांनी दिवसभर या मार्गावर गस्त घालणे.  बेशिस्त रिक्षाचालकांचा कायमचा बंदोबस्त करावा. पदपथावर अतिक्रमण केलेल्या खाद्यपदार्थ, गॅरेज, स्पेअर पार्टचे दुकानदार तसेच, शॉपिंग मॉल, बेकरी व हॉटेल्सवर कठोर कारवाई करावी. 

गणेशोत्सवापर्यंत काम न करण्याचे पालिकेचे पत्र

पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रात्री उशिरापर्यंत नागरिक देखावे पाहण्यासाठी बाहेर असतात. तसेच, पीएमपीएल बस वाहतूकही सुरू असते. नागरिक व वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन पालिका भवनासमोर रस्त्यावर काम सुरू करू नये, असे पत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेने बुधवारी (दि. 8) दिले आहे, असे  बीआरटीएस विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी सांगितले.