Tue, Jul 23, 2019 10:27होमपेज › Pune › बीअर शौकिनांचा कल विदेशी मद्याकडे

बीअर शौकिनांचा कल विदेशी मद्याकडे

Published On: Jan 11 2018 1:28AM | Last Updated: Jan 11 2018 12:08AM

बुकमार्क करा
पुणे : समीर सय्यद

बीअरवरील अबकारी करामध्ये वाढ झाल्याने अनेक कंपन्यांनी बीअरची निर्मिती बंद केली होती. नवीन वर्षाचे स्वागतावेळी राज्यात सर्वत्र बीअर उपलब्ध नसल्याने बीअर शौकीन भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याकडे वळल्याचे दिसून येत आहे. कारण नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये 4 लाख 32 हजार 308 लिटरने बीअरच्या विक्रीत घट झाली आहे, तर दोन लाख 92 हजार 529 लिटर विदेशी मद्याची विक्री वाढली आहे. सध्या बीअरचा तुटवडा असून, बीअऱ शौकिनांचा कल विदेशी मद्य घेण्याकडे वाढत असल्याचे मद्यविक्रेत्यांनी सांगितले.

स्ट्राँग, माईल्ड बीअर पिऊन चिल आऊट होणार्‍या मद्यप्रेमींना चांगलीच ‘किक’ बसणार, हे राज्य शासनाने बीअरवरील अबकारी कर वाढविल्यानंतरच निश्चित झाले होते. या निर्णयाविरोधात मागणी असलेली बीअरनिर्मिती करणार्‍या कंपन्या औरंगाबाद, लोणंद (फलटण), मुंबई येथे आहेत. ऑक्टोबरमध्ये बीअरवरील अबकारी करामध्ये वाढ शासनाने केली. त्यामुळे ग्राहकांना हे परवडणारे नाही, असे सांगत कर कमी केल्याशिवाय बीअरचे उत्पादन न करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला होता. सध्या कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. वाढीव किमतीची बीअर बाजारात उपलब्ध झाली असून, याकडे मद्यपींनी पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बीअरचे उत्पादन बंद काळात राज्यात 80 ते 90 टक्के बीअरचा तुटवडा निर्माण झाला होता. बीअरच्या उत्पादनानंतर 6 महिने ते एक वर्षपर्यंत विक्री करता येते; परंतु अनेक परमिट रूममध्ये मुदत संपलेली बीअर विक्री करून मद्यप्रेमींच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू होता. सध्या बीअरचे उत्पादन सुरू झाले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक मद्यविक्री होते. कारण ख्रिसमस् आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मद्याची मागणी वाढते. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. ऐन मोसमात बीअर न मिळाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. परंतु ‘माईल्ड नही स्ट्राँग ही सही’ असे म्हणत मद्यपींनी पेगवर पेग रिचवल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्टॉक कमी असल्याने विक्रेत्यांचे फावले 

बीअरचे उत्पादन बंद असल्याने साहजिकच तुटवडा निर्माण झाला आहे. नवीन करासह उपलब्ध झालेल्या 5 टक्के अल्कोहोल असणारी एलपी माईल्ड बीअर किंमत 118 असून, ती 120 रुपयांनी विकली जात आहे, तर 158 असलेली बीअर 160 रुपयांना ग्राहकांच्या माथी मारली जात आहे. याकडे उत्पादन शुल्क विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.