Sun, Oct 20, 2019 01:09होमपेज › Pune › व्हर्च्युअली नाती जुळवा जपून...

व्हर्च्युअली नाती जुळवा जपून...

Published On: Dec 31 2017 1:48AM | Last Updated: Dec 31 2017 12:10AM

बुकमार्क करा
पुणे : पुष्कराज दांडेकर 

लग्न करण्याच्या तयारीत असलेले तरुण तसेच एकटेपणाला कंटाळून निवृत्तीनंतर आधार शोधण्यासाठी लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनो, मॅट्रीमोनियल साईट्स आणि सोशल मीडियावर जीवनसाथी शोधत असाल तर सावधान! 

पुण्यातील तरुण आणि ज्येष्ठांना लग्नाच्या आमिषाने भावनिकदृष्ट्या गुंतवून सायबर स्पेसमधील भामट्यांनी कोट्यवधी रुपये उकळले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मागील 11 महिन्यांत अशाच प्रकारे 91 जणांना, तर 2016 मध्ये 66 जणांना भावनिक गुंत्यात अडकवून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. बळी पडणार्‍यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. 

सध्या इंटरनेटच्या जाळ्यामुळे संपर्क आणि संवादाची माध्यमे जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. सोशल मीडिया, इतर सोशल वेबसाईट्स आणि सायबर स्पेसमधील इतर घटकांमुळे जगभरातील लोकांसोबत मैत्री आणि संवाद वाढला. याच व्हर्च्युअल जगतात जास्तीत जास्त वावर वाढल्याने फिजिकली प्रेझेन्स नसतानाही लोक इतरांशी भावनिकदृष्ट्या जोडले जात आहेत.

टेक्नोसॅव्ही झालेली तरुणाई तर व्हर्च्युअल जगतातील लोकांशी नाती जुळविण्यास प्राधान्य देते आहे. यात निवृत्तीनंतर आपल्या एकटेपणाला कंटाळून पुन्हा संसार थाटण्याच्या तयारीत असलेले ज्येष्ठ नागरिकही मागे  नाहीत. मागील काही वर्षांत साठीनंतर व्हर्च्युअली लग्नाची रेशीमगाठ बांधलेली अनेक ज्येष्ठ जोडप्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. मॅट्रीमोनियल साईट्सवर तसेच फेसबुकवर सायबर भामटे आपले महिला किंवा पुरुषाच्या नावाने सुंदर व्यक्तीचा फोटो प्रोफाईलवर ठेवून आपले खाते उघडतात. या साईट्सवरून हे भामटे महिला किंवा पुरुष तरुणांशी आणि ज्येष्ठांशी मैत्री करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवत भावनिकदृष्ट्या अडकवतात.

त्यानंतर भावनिक आवाहन करत त्यांना गिफ्ट पाठवले असल्याचे सांगून किंवा घरगुती कारणे सांगून पैसे खात्यावर भरण्यास लावून फसवतात. मागील वर्षी एका उच्च पदावरून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून 94 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी दोन नायजेरियन तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. या भामट्यांनी अशा प्रकारे 63 महिलांना जाळ्यात ओढून साडेतीन कोटींची फसवणूक केली होती;  तर पुण्यातील सात महिलांना लग्नाच्या आमिषाने गुंतवून महिलांकडून पैसे उकळून त्यांना लाखो रुपयांना  गंडा घालणार्‍या उच्चभ्रू भामट्याला सायबर गुन्हे शाखेेने अटक केली.