Wed, Jul 24, 2019 12:37होमपेज › Pune › सावधान; बालदमा वाढतोय

सावधान; बालदमा वाढतोय

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 17 2018 1:25AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

वाढते प्रदूषण, आहारातल्या चुकीच्या सवयी, उपचाराकडे होणारे दुर्लक्ष यामुळे लहान बालकांमध्ये दम्याचा आजार वाढत आहे. नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात दिवसाला सुमारे तीन टक्के बालकांना हा त्रास असल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करत आहेत. 

पूर्वी मोठ्यांमध्ये दम्याचा आजार असण्याचे प्रमाण अधिक होते. सध्या या आजाराने लहान मुलेही त्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. बालदम्याची वाढती संख्या चिंताजनक बनत चालली आहे.  जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दिवसाकाठी 150 रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. यामध्ये सुमारे 80 रुग्ण ताप, सर्दी व इतर साथीच्या आजारांवर उपचारांसाठी येतात. यामध्ये सुमारे तीन टक्के बालकांना दम्याच्या त्रासावर उपचार घ्यावे लागत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

पूर्वीपेक्षा लहान मुलांमध्ये हा आजार वाढत असल्याने काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.  शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. वाहनांमधून निघणार्‍या धुरामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. याबरोबरच हवेमधील धुळीच्या कणांमध्येही वाढ होत आहे. यामुळे दम्याचे प्रमाण वाढत आहे. याबरोबरच शहरात जंक फूडची विक्री करणारी मोठी हॉटेल्स निर्माण झाली आहेत. जंक फूड खाणार्‍या मुलांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. 

लस उपलब्ध नाही 

पोलिओची लस घेऊन पोलिओ होऊ नये यासाठी खबरदारी घेता येते. त्यासाठी लसीची पुरेशी उपलब्धता देखील आहे; मात्र दमा होऊ नये यासाठी असणारी लसच बाजारामध्ये उपलब्ध नाही. त्यासाठी कोणतेच इंजेक्शन देण्याची सोय नाही. त्यामुळे नागरिकांनी मुलांना हा त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. 

उपाय ः
1) रस्त्यावरील प्रदूषणापासून दूर राहणे.
2) प्राणायाम, मेडिटेशन, व्यायाम करणे.
3) जंक फूड टाळणे, सकस आहार करणे.
4) घरातील परिसरात झाडे लावणे.
5) मास्क वापरणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे.