Thu, Jun 27, 2019 10:02होमपेज › Pune › स्वत:च्या पायावर उभे राहणारे तरबेज विद्यार्थी तयार करा

स्वत:च्या पायावर उभे राहणारे तरबेज विद्यार्थी तयार करा

Published On: Feb 05 2018 1:55AM | Last Updated: Feb 05 2018 1:41AMबावडा : वार्ताहर

शाळांमधून फक्त शिक्षणच न देता पुढील आयुष्यात स्वत:च्या पायावर उभे राहतील असे तरबेज विद्यार्थी तयार करण्याचे काम झाले पाहिजे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 
निरनिमगाव येथील कै. अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन हे अनंतराव पवार विद्यालय व अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निरनिमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.2) करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते आदर्श शेतकरी, गोपालक, समाजसेवक, आदर्श पत्रकार या गौरव पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यालयाने आयोजित केलेल्या आदिश्री बौध्दिक चाचणीतील विजेत्या विद्यार्थ्यांना अजित पवार यांच्या हस्ते बक्षिसेही देण्यात आली.  यावेळी मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे, मुख्याध्यापक बी. जे. गरगडे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. बी. पिसे आदींनी केले. अजित पवार म्हणाले, माझ्या वडील व पवार कुटुंबियांचे मार्गदर्शक असलेले अनंतराव पवार यांचे सन 1978मध्ये निधन झाले. त्यानंतर येणार्‍या जुलै महिन्यात पवारसाहेब मुख्यमंत्री झाले. मात्र माझ्या वडिलांना पवारसाहेब मुख्यमंत्री झालेले पाहावयास मिळाले नाहीत. निरनिमगाव विद्यालयाला माझ्या वडिलांचे नाव असल्यामुळे माझ्या मनात वेगळीच भावना आहे. या विद्यालयाला 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे विद्यालयास 25 लाख रूपयांची मदत मी जाहीर करीत आहे.

यावेळी अजित पवार यांनी देशातील व राज्यातील भाजप सरकारच्या कामगिरीवर जोरदार टीका केली. कोणत्याही पिकाला हमीभाव नाही, साखर उद्योग अडचणीत आला आहे. तसेच दूध उद्योगही संकटात सापडला आहे. एस.टी.चे कर्मचारी, अंगणवाडी सेविकांना चांगला पगार सरकार देत नाही. राज्य सरकार हे 4 ते 5 लाख नोकरीच्या जागा कायम बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. कर्जमाफी जाहीर केली, माञ कृती नाही, अशी टीका त्यांनी केली. मी पालकमंत्री असताना कोरेगाव भीमा येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवत होतो. या सरकारने चोख पोलिस बंदोबस्त दिला नाही, त्यामुळेच दंगल घडली. त्यात एकाचा मृत्यू झाला. आता कोणावर 302 चा गुन्हा दाखल करायचा, असा सवालही अजित पवार यांनी सरकारला विचारला.

यावेळी प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. विद्यालयात 610 विद्यार्थ्यी शिक्षण घेत असून, गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात, असे नमूद केले.  यावेळी आ. दत्तात्रय भरणे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर, प्रविण माने, जालिंदर कामठे, प्रतापराव पाटील, महारूद्र पाटील, अशोक घोगरे, यशवंत माने, अमोल भिसे, शोभाताई घोगरे, नवनाथ रूपनवर, तुषार घाडगे, अरविंद वाघ, अजित टिळेकर, सरपंच सविता खरात, उपसरपंच ज्योतिराम घोडके, अशोक चव्हाण, जालिंदर गायकवाड, अजित घोगरे, रामकृष्ण गरगडे, विजय पिसे, शशिकांत चांगण, सुभाष जाधव, दीपक जाधव, पोपट जाधव, मारुती पिसे, गौतम गायकवाड, विलास माकर, संतोष गरगडे, जिग्नेश कांबळे, अनिल काळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. एल. मोरे यांनी केले. रणजित घोगरे यांनी आभार मानले.