Thu, Jun 20, 2019 02:01होमपेज › Pune › पुणे स्टेशनवरील बॅटरीवर चालणार्‍या गाड्या बंद

पुणे स्टेशनवरील बॅटरीवर चालणार्‍या गाड्या बंद

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:06AMपुणे : निमिष गोखले 

पुणे स्टेशनवरील बॅटरीवर चालणार्‍या गाड्या बंदच असल्याचे धक्कादायक चित्र सध्या दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांच्या सोयीकरिता बॅटरीवर चालणार्‍या दोन गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. प्लॅटफॉर्म एक व पुणे स्टेशनच्या बाहेर ही सुविधा प्रवाशांसाठी विनाशुल्क उपलब्ध करण्यात आली होती. परंतु, काही दिवसांतच या गाड्या कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद करण्यात आली. वाजत-गाजत सुरू करण्यात आलेल्या या गाड्या आता स्टेशनवरून गायब झाल्याने सर्वजणच आश्‍चर्य व्यक्त करत आहे. 

पुणे स्टेशनसह देशभरात एकूण 75 स्टेशन ए-1 श्रेणीत मोडत असल्याने, बॅटरीवर चालणार्‍या गाड्या सुरू करणे अनिवार्य होते. तसा नियमच असल्याने रेल्वे बोर्डाने याबाबत पुणे विभागासाठी परिपत्रक जारी केले होते. 2016 मध्ये बॅटरीवर चालणार्‍या दोन गाड्या सुरू केल्या गेल्या. एका राष्ट्रीयकृत बँकेने रेल्वेला या गाड्या दान केल्या होत्या. या गाड्यांची बॅटरी स्टेशन आवारात रिचार्ज केली जायची. याकरिता रेल्वे वीज पुरवत होती. तर चालकाचा पगारही राष्ट्रीयकृत बँक पाहत होती. मात्र, बहुतांश प्रवाशांपर्यंत या गाडीच्या चालकाचा मोबाईल क्रमांक न पोहोचल्याने, या उपक्रमालाच कमी प्रतिसाद मिळाल्याचे कारण देऊन ही सुविधा बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे बहुतांश वेळा चालकच उपलब्ध नसल्याने प्रवासी गाडीची वाट पाहत ताटकळत उभे राहायचे. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींमुळे अखेर ही सेवा बंद करण्यात आली, अशी माहितीही सूत्रांनी दिली.  

अशी आहे सुविधा

बॅटरीवरील गाडी स्टेशन आवारातून पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म एकवर कुठेही जायचे असल्यास ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांना घेऊन जाते. गाडीवर असणारा मोबाईल क्रमांक फिरवल्यानंतर चालकाकडून रेल्वे किती वाजता येणार आहे, याची माहिती घेतली जाते. बॅटरीवर चालणार्‍या गाडीचे एक-दोन दिवस आगोदरदेखील आरक्षण करता येते. फर्स्ट कम फर्स्ट धर्तीवर ही सुविधा उपलब्ध केली जाते. गाडी बॅटरीवर चालणारी असल्याने प्रदूषणाचा प्रश्‍न नसून, इको फ्रेन्डली पद्धतीमुळे पर्यावरणाची हानीही होत नाही. ताशी 10 किलोमीटर एवढा तिचा वेग असतो.

 

Tags : pune, pune nes, pune station, Battery cars,