Thu, Jul 18, 2019 15:17होमपेज › Pune › सख्ख्या भावांचा तरुणीवर बलात्कार 

सख्ख्या भावांचा तरुणीवर बलात्कार 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बारामती : प्रतिनिधी

बारामतीत नोकरीच्या निमित्ताने आलेल्या 29 वर्षीय तरुणीवर दोघा सख्ख्या भावांनी वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात बलात्कारासह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल रघू म्हेत्रे व रवी रघू म्हेत्रे (रा. काझड-बोरी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत.

संबंधित तरुणीने याबाबत फिर्याद दाखल केली. गोंदिया जिल्ह्यातील ही तरुणी बारामतीत नोकरीनिमित्त आली आहे. दि. 31 डिसेंबर 2016 पासून ही घटना घडत असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींचे बारामती एमआयडीसीमध्ये विश्वा अ‍ॅम्पायर नावाचे ऑफिस आहे. दि. 16 नोव्हेंबर रोजी ती या कार्यालयात गेली असताना दोघे भाऊ तेथे होते. फिर्यादीने अमोल याला लग्नाबाबत विचारणा केली. 

त्यावेळी रवी याने तिच्या जवळ येऊन ऑफिसचा दरवाजा लावून घेतला. तिच्या जवळ येत तिला अंगावर ओढून घेतले. तुझ्या भावाबरोबर माझे प्रेमसंबंध असून, आम्ही लग्न करणार आहोत, असे फिर्यादीने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने फिर्यादीच्या गळ्यावर धारदार हत्यार ठेवून मला तुझ्याशी शारीरिक संबंध करू दे, नाही तर येथेच तुझ्या खांडोळ्या करेन, अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. 

या प्रकारानंतरही फिर्यादी पुन्हा लग्नाबाबत विचारणा करण्यासाठी गेली असताना ऑफिसमध्ये दोघे भाऊ हजर होते. अमोल याने तिला जातिवाचक शिवीगाळ करत मी तुझ्याशी लग्न करू शकत नसल्याचे सांगितले. रवी यानेही जातिवाचक शिवीगाळ करून तू आम्हा दोघा भावांचा नाद सोड, असे म्हणत तिला जिवे मारण्याची धमकी दिली. अमोल याने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. यातून दिवस गेल्याचे कळल्यावर जबरीने गर्भपात करायला भाग पाडल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.