Tue, Nov 19, 2019 10:45होमपेज › Pune › ‘लोकसभा 2024’मध्ये बारामतीत कमळ फुलवणार

‘लोकसभा 2024’मध्ये बारामतीत कमळ फुलवणार

Published On: Jun 26 2019 1:45AM | Last Updated: Jun 26 2019 1:19AM
पिंपरी : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना पराभूत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. प्रॅक्टिकली ते सहजशक्य नसले, तरी आम्ही निश्‍चितच प्रयत्न करू. त्याचप्रमाणे 2024 मधील लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये कमळ फुलविण्याचे आमचे ध्येय आहे, असे पुण्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे नमूद केले. मोरवाडी (पिंपरी) येथील भाजप पक्ष कार्यालयात मंगळवारी (दि. 25) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अजितदादा तुरुंगात जातील का, हे सांगायला मी ज्योतिषी नाही

जलसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना जेलमध्ये टाकण्यात येईल, असे भाजपचे नेते सांगत होते. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना अटक करण्यात येईल का, असा प्रश्‍न विचारला असता, ते प्रकरण न्यायालयात आहे. त्यांना अटक होणार की नाही हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही, असे पाटील यांचे उत्तर होते.

भाजप-शिवसेनेमध्ये 25 वर्षांपासून युती आहे. जागावाटपात भागीदारी आणि सत्तेमध्ये 50-50 टक्के जागा हे ठरलेले आहे. प्रत्यक्षात चर्चेदरम्यान जागावाटपात मागे-पुढे होऊ शकते. शिवसेना किंवा भाजपचे कार्यकर्ते अनेक वर्षे काम करीत आहेत. कोणाला लढायचे असेल तर ते लढतात, कोणी बंड करतात, तर काहीजण शांत राहतात. युतीमध्ये समजदारी वाढू लागली आहे. त्यामुळे जागावाटपात मागे-पुढे होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणूक शक्य

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 15 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल आणि निवडणूक 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.