Mon, Apr 22, 2019 06:06होमपेज › Pune › बार व रेस्टॉरंटच्या ‘फायर ऑडिट’चा मुद्दा ऐरणीवर

बार व रेस्टॉरंटच्या ‘फायर ऑडिट’चा मुद्दा ऐरणीवर

Published On: Dec 30 2017 1:31AM | Last Updated: Dec 29 2017 11:09PM

बुकमार्क करा
पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

परळ परिसरातील कमला मिल कम्पाउंडमधील वन अबव्ह पब आणि मोजोस पबला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेने पिंपरी-चिंचवडमधील बार, रेस्टॉरंट व हॉटेल्सच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या रेस्टॉरंट, बारचे ‘फायर ऑडिट’ करण्याची गरज व्यक्त होत आहे.

परळ परिसरातील कमला मिल कम्पाउंडमधील वन अबव्ह पब आणि मोजोस पबला लागलेल्या भीषण आगीत 15 जण ठार, तर 12 जण जखमी झाले आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागली, असे आगीचे कारण सांगितले जात आहे. याबरोबरच क्लबमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याचे, अग्निशामक दलाची परवानगी नसल्याचे, काहींना नियम डावलून परवानगी दिली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधीलही अशा बार, रेस्टॉरंट, हॉटेल्सच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

हॉटेल असोसिएशनकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये 165 बार, रेस्टॉरंट; तसेच 350 व्हेज-नॉनव्हेज हॉटेल्स आहेत. ‘फायर फायटिंग’ यंत्रणेबाबत विचार केल्यास त्यांची सुरक्षा बर्‍यापैकी ‘राम भरोसे’ आहे. यासंदर्भात महापालिकेचे अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांना विचारले असता ते म्हणाले की,   पूर्वी हॉटेल व्यावसायिकांना जे ‘ना-हरकत’ दाखले दिले जात होते ते अग्निशामक दलाकडून नूतनीकरण करून घेणे बंधनकारक होते; मात्र शासनाने एक परिपत्रक काढून हा नियम बदलला. 

त्याऐवजी बार, रेस्टरेन्ट ,हॉटेल्सनी दर सहा महिन्यांनी एबी फॉर्म भरून द्यायचा आपल्या बार, रेस्टॉरंटची अग्निरोधक यंत्रणा (फायर फायटिंग) सुस्थितीत व उत्तम कार्यरत असल्याचे फायर लायसेन्स एजन्सीमार्फत प्रमाणित करून घ्यायचे आणि ते सादर करायचे, अशी पद्धत अमलात आणली. पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक विभागाकडे नूतनीकरण, अथवा बी फॉर्म आला, तरी तो जमा करून घेतला जातो, असे गावडे यांनी सांगितले.

अन्न परवाना विभागाचे अधिकारी करंजखेले यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपण हे काम पाहत नाही, नारगोंडे यांच्याशी संपर्क साधा, असे सांगत वेळ मारून नेली. शहरातील अनधिकृत हॉटेल्स, रेस्टॉरंट, बारची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही परळ आगीच्या घटनेमुळे होऊ  लागली आहे.