Wed, Jun 26, 2019 17:29होमपेज › Pune › गणरायाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सजली

गणरायाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सजली

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 12 2018 1:49AMपुणे : प्रतिनिधी

सुखकर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सजली असून प्रमुख गणेश मंडळांची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. गुरुवारी (ता. 13) भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रींचे आगमन होत आहे. यापार्श्‍वभूमीवर शहरातील मानाच्या गणपती मंडळांमार्फत पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत बाप्पांची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 

  कसबा गणपती

श्रींच्या मिरवणुकीस गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता सुरुवात होईल. चांदीच्या पालखीतून श्रींची मूर्ती कुंटे चौक- लिंबराज महाराज चौक - अप्पा बळवंत चौक - बुधवार चौक - लालमहाल चौक मार्गे उत्सव मंडपात आणली जाईल. देवळणकर बंधूंचे नगारावादन, प्रभात ब्रँड आणि श्रीराम, आवर्तन ढोलताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतील. श्रींची प्रतिष्ठापना 11 वाजून 55 मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते होईल. 

  तांबडी जोगेश्‍वरी गणपती

श्रींची मिरवणूक सकाळी दहा वाजता नारायण पेठेतील न. चि. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून निघेल. यात सतीश आढाव यांचे नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, शिवमुद्रा व ताल ढोलताशा पथक सहभागी होईल. पारंपरिक चांदीच्या पालखीतून श्रींची मिरवणूक मंदार लॉज - कुंटे चौक - लक्ष्मी रस्ता - गणपती चौक ते ग्रामदैवत तांबडी जोगेश्‍वरी मार्गे मंदिरानजिकच्या उत्सव मंडपात येईल. श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना दुपारी बारा वाजून 15 मिनिटांनी बांधकाम व्यावसायिक अमोल रावतेकर यांच्या हस्ते होईल, अशी माहिती कार्याध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी दिली.

  गुरूजी तालीम गणपती

फुलांच्या रथात विराजमान झालेली श्रींची उत्सवमूर्ती गणपती चौक -लिंबराजमहाराज चौक- अप्पा बळवंत चौक- बुधवार चौक बेलबाग चौक मार्गे उत्सवमंडपात मिरवणुकीने आणली जाईल. जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्‍वराज बॅण्ड, नादब्रम्ह, गर्जना तसेच सासवड येथील शिवरूद्र, गुरूजी प्रतिष्ठान आदी ढोलताशा पथके मिरवणुकीत सामील होतील. श्रींची प्रतिष्ठापना दुपारी 1 वाजता उद्योगपती आदित्य शर्मा यांच्या हस्ते होईल, अशी माहिती कार्याध्यक्ष पृथ्वीराज परदेशी यांनी दिली. 

  तुळशीबाग गणपती

श्रींची मिरवणूक सकाळी दहा वाजता गणपती चौक येथून निघेल. फुलांच्या रथातून श्रीं. ची मूर्ती गणपती चौक - नूमवि शाळा - अप्पा बळवंत चौक - फरासखाना - समाधान चौक - गणपती चौक येथून उत्सवमंडपात येईल. या मिरवणुकीत लोणकर बंधुचे नगारा वादन, उगम, स्वामी प्रतिष्ठान, गजर आदी पथके सहभागी होतील. श्रींची प्रतिष्ठापना दुपारी साडे बारा वाजता अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजंय राजे भोसले हस्ते होईल, अशी माहिती नितीन पंडित यांनी दिली. 

  केसरीवाडा गणपती

पारंपरिक पद्धतीने पालखीतून श्रींच्या मिरवणुकीस सकाळी दहा वाजता रमणबाग चौकातून सुरुवात होईल. मिरवणूक लक्ष्मी रस्ता, विजय चित्रपटगृह, माती गणपतीमार्गे टिळक वाड्यातील सभामंडपात दाखल होईल. मिरवणुकीत श्रीराम आणि शिवमुद्रा ही ढोल-ताशा पथके, बिडवे बंधुंचे नगरावादन पथक सहभागी होणार आहेत. सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होईल. त्यानंतर दुपारी 3 ते 4.30 या वेळेत सग्रहमख वरदविनायक याग केला जाणार आहे.  

  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रींची मिरवणूक गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता मुख्य मंदिरापासून निघेल. फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्रींची मूर्ती अप्पा बळवंत चौक - शनिपार चौक - टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात आणली जाईल. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, मयूर बँड आणि मानिनी महिला ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. श्रींची प्रतिष्ठापना 11 वाजून 5 मिनिटांनी मोरगाव येथील गाणपत्य डॉ. धुंडिराज पाठक शास्त्री यांच्या हस्ते होईल. तसेच, तामिळनाडूतील तंजावर येथील साकारण्यात आलेल्या राजराजेश्‍वर मंदिरावरील दिव्यांच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन सायंकाळी सात वाजता खा. अनिल शिरोळे यांच्या हस्ते पार पडेल. 

  अखिल मंडई मंडळ

श्रींची मिरवणूक गुरुवारी सकाळी दहा वाजता मुख्य मंदिरापासून निघेल. फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथामध्ये श्रींची मूर्ती टिळक पुतळा - गोटीराम भैय्या चौक - शिवाजी रस्त्याने रामेश्‍वर चौकमार्गे उत्सव मंडपात आणली जाईल. न्यू गंधर्व बँड आणि  ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. श्रींची प्रतिष्ठापना दुपारी 12 वाजता बीव्हीजी ग्रुपचे हणमंत गायकवाड यांच्या हस्ते होईल.

  हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट

फुलांच्या काल्पनिक रथात श्रींची मूर्ती विराजमान झाल्यानंतर सकाळी 9 वाजता मिरवणुकीस प्रारंभ होईल. शनिपार चौक - लक्ष्मी रस्ता - गणपती चौक - समाधान चौक - रामेश्‍वर चौक मार्गे मूर्ती उत्सवमंडपात आणली जाईल. श्रींची प्रतिष्ठापना सकाळी अकरा ते साडे अकरा दरम्यान मंडळाच्या पाच जेष्ठ संस्थापकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मिरवणुकीत शिवतेज आणि श्रीराम ग्रुप ही दोन पथके सहभागी होतील, अशी माहिती बाळासाहेब मारणे यांनी दिली. 
 
  श्रीमंत भाऊ साहेब रंगारी गणपती ट्रस्ट

श्रींची मिरवणुकीस सकाळी साडे आठ वाजता सुरुवात होईल. सकाळी अकरा वाजता देहू संस्थानचे विश्‍वस्त बाळासाहेब मोरे आणि रामपल्ली यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रथेप्रमाणे श्रींच्या रथाचे सारथ्य महापौर करणार असून यंदा रथ ओढण्याचा मान लोणी काळभोर (हवेली) येथील सूर्यकांत काळभोर यांच्या राजा आणि सोन्या ह्या जोडीला देण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे ट्रस्टी सूरज रेणुसे यांनी दिली.