Tue, Mar 26, 2019 02:11होमपेज › Pune › ‘बॅनर’च्या गौडबंगालाची घोरपडीत जोरदार चर्चा 

‘बॅनर’च्या गौडबंगालाची घोरपडीत जोरदार चर्चा 

Published On: Feb 05 2018 1:55AM | Last Updated: Feb 05 2018 1:55AMमुंढवा : वार्ताहर

प्रभाग क्रमांक 21 मधील राजकीय कुरघोडी संपायचे नाव घेत नाही. घोरपडी परिसरात मागील तीन-चार दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तिने रात्रीच्या वेळी काही ठिकाणी बॅनरबाजी करून माननीयांना धक्का दिला आहे. येथील चार नगरसेवकांपैकी एकाला बाजूला ठेवून बाकी तिघांच्या  नावे आरोप केले आहेत.  यामागे नक्की  काय गौडबंगाल आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. आपले नाव कुठेही येणार नाही. याची बॅनरबाजी करणार्‍याने पुरेपूर काळजी घेतली आहे.  त्यामध्ये कुठे नेऊन ठेवली घोरपडी या मथळ्याखाली - मनपाच्या अधिकार्‍यांशी संगनमत करून बांधकामावरील कारवाई थांबवतात, अनधिकृत बांधकामे नियमित केली जात असल्याचा उल्लेख केला आहे.

दुस-या एका बॅनरमध्ये हेच का ‘अच्छे दिन’ या शीर्षकाखाली का करता जनतेची फसवणूक असा उल्लेख केला आहे. संबंधित व्यक्तिने 15 फेब्रुवारी रोजी उपोषण करणार असल्याचाही उल्लेख या बॅनरमध्ये केला आहे. रातोरात लावलेले बॅनर सकाळी लक्षात येताच नागरिकांनी लगेच काढून टाकले आहेत. मात्र, काही चाणाक्ष नागरिकांनी तातडीने मोबाईलवर त्याचे छायचित्र टिपून व्हायरल केले आहे. एकंदरीतच नागरिकांमध्ये हा औत्सुकाच्या विषय ठरला आहे.  चारही नगरसेवक एकाच पक्षाचे आहेत. बॅनरमध्ये तिघांचाच उल्लेख केला आहे. एकाला टाळले आहे. या प्रकारामध्ये नेमके कोणाला टार्गेट करायचे आणि कोणाला वाचवायचे आहे. यामागे काय राजकिय षडयंत्र आहे याचे गणित उलगडलेले नाही. बॅनरचे फोटो व्हॉटस अ‍ॅपवर  व्हायरल झाले असून लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व पालिका अधिकार्‍यांपर्यंत पोहचले आहेत. यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.