पुणे : प्रतिनिधी
बँक ऑफ इंडियाची 300 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी कंपनी तसेच कंपनीचे मालक आणि कॅनरा बँकेच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह 9 जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश ए. के. पाटील यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
औंध येथील वेरॉन अल्युमिनीअम प्रा. लि. (संचालक श्रीकांत पी. सवाईकर), औंध येथील वेरॉन ऑटो कंपनी प्रा. लि. (संचालक श्रीकांत पी. सवाईकर), श्रीकांत पांडुरंग सवाईकर (55, रा. प्रेमिओ अपार्टमेंट, शिवाजीनगर), डेक्कन जीमखाना येथील कॅनरा बँकेचे माजी मुख्य व्यवस्थापक सुब्रय्या रमा हेगडे (61, रा. कल्पतरू इस्टेट, पिंपळेगुरव), हिंद ऑटो इंटरप्रायझेस आणि महाराष्ट्र मेटल कॉर्पोरेशनचे मालक अशोक लक्ष्मणराव मोरे (56, रा. भालेकरनगर, पिंपळेगुरव), सवाईकरच्या कंपनीतील सहायक लेखनीक गणेश जगन्नाथ कोल्हे (32, रा. सोमाटणे फाटा,मावळ), गणेश राम गायकवाड (30, रा. सदगुरू अपार्टमेंट, साईनगर, कात्रज), रतना मेटल मार्टचे मालक मनोज सुधाकर साळवी (33, रा. जय गणेश साम्राज्य, भोसरी), श्वेता ट्रेडिंग कंपनीचे मालक मारूती गंगाराम चव्हाण (42, रा. जय गणेश साम्राज्य, भोसरी) यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्यांनी आपआपसात संगणमत करून बँक अधिकार्यांच्या व कर्मचार्यांना हाताशी धरून कट रचला. कॅनरा बँकेने दिलेल्या चांगल्या वर्तुवणुकीच्या हमीमुळे बँक ऑफ इंडिया 300 कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत नाईक यांनी सीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे फिर्याद दिली होती. याप्रकरणी कट रचणे (भादवि120 ब), फसवणूक (भादवि 420), बनावट कागदपत्रे (भादवि 468) आणि बनावट कागदपत्रे वापरात आणणे (भादवि 471) अशा विविध कलमांन्वये तसेच भ्रष्टाचाराच्या कलम कलम 13 (2) 13 (1)(ड) अन्वये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.