Thu, Jul 18, 2019 00:54होमपेज › Pune › बँक कर्मचारी संपावर; नागरिक त्रस्त

बँक कर्मचारी संपावर; नागरिक त्रस्त

Published On: Jun 01 2018 2:11AM | Last Updated: May 31 2018 11:57PMपिंपरी : प्रतिनिधी

अवघी दोन टक्केच पगारवाढ झाल्याने आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचार्‍यांनी दोन दिवस संप पुकारला होता. त्यामुळे बँकांमार्फत होणार्‍या सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. पिंपरी-चिंचवड शहरातही या संपाचा परिणाम जाणवला. महिन्याच्या शेवटी दोनदिवसीय संप पुकारल्याने नोकरदारांसह सर्वसामान्य नागरिकांनाही या संपाचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

अनेक एटीएममध्ये खडखडाट.. 

बुधवार व गुरुवार दोन दिवस बँकांची शटर पूर्णपणे बंंद होती. स्वीपरपासून ते अधिकारी यांच्यापर्यंत सर्वांनीच संप पुकारला होता. त्यामुळे नागरिकांना एटीएम व ऑनलाइन ट्रान्झॅक्शनवरच अवलवूंन राहावे लागले. सुरुवातीचे तीन-चार तास शहरातील एटीएम सुसाट होते. परंतु नंतर मात्र बर्‍याच ठिकाणी पैशांचा तुटवडा जाणवला. तर अनेक एटीएममध्ये खडखडाट दिसून आला.  बुधवारी सकाळपासूनच कर्मचारी संपावर गेल्याने शहरातील विविध बँकांच्या शाखांमध्ेय व्यवहार पूर्णपणे ठप्पहोते. महिन्याच्या शेवटच्या दिवशी नोकरदारांचा पगार बँकेत जमा होत असतो.

परंतु संपामुळे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने नोकरदारांना पगार काढता आला नाही. तसेच महिन्याच्या  शेवटी काही चाकरमानी  पैसा जमा करण्यासाठी येतात. त्यांनाही या संपाची पूरेशी कल्पना नसल्याने अनेकांना हात हलवत परत जावे लागले. संपकाळात ऑनलाईन व्यवहार सुरळीत राहणार असल्याने अनेकांनी बँकांमध्ये ऑनलाईन व्यवहार करणे पसंत केले. बँकांनी दोन दिवस पुरेल एवढी रक्कम टाकल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात मात्र नागरिकांचे रोकडअभावी हाल झालेले पहायला मिळाले.  दोन दिवसात हजारो कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याचे चित्र शहरात दिसून आले. 

वेतनवाढीबाबत बँक कर्मचार्‍यांची उपेक्षाच

देशभरातील 21 सार्वजनिक बँका, 13 खासगी बँका, 6 परदेशी बँका आणि 56 प्रादेशिक ग्रामीण बँका यातील जवळपास दहा लाख बँक कर्मचारी व अधिकारी संपावर गेले होते. प्रामुख्याने वेतनवाढीच्या प्रश्‍नाबाबत हा संप पुकारण्यात आला. एक नोव्हेंबर 2017 पासून नवीन वेतनवाढ बँक कर्मचार्‍यांना लागू होणे अपेक्षित होती. परंतु एक नोव्हेंबर ते आज 30 मे पर्यंत सरकारने केवळ वाटाघाटी केल्या. बँकर्सने केवळ 2 टक्केच वाढ केली. सरकारने बँकांना नोडल पॉईंट केल्यामुळे सरकारच्या जनधन योजना, डिमॉनेयझेशन, अटल पेन्शन, मुद्रा योजना असो किंवा कुठही सबसिडीचे वाटप असो ते बँकामार्फतच केले जाते. त्यामुळे कर्मचारी कामाचा ताण वाढला. परंतू तुलनेने पगारवाढ कमी दिली.  त्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला होता.