होमपेज › Pune › परीक्षा काळात इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरण्यावर बंदी

परीक्षा काळात इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरण्यावर बंदी

Published On: Jun 01 2018 2:12AM | Last Updated: Jun 01 2018 12:05AMपुणे : प्रतिनिधी 

दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान व्हॉट्सअ‍ॅपहून होणारी पेपरफुटी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. त्यामुळेच पुढील वर्षी परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये काम करणार्‍या सर्वच कर्मचार्‍यांना परीक्षा काळात इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार असून सीसीटीव्ही आणि मोबाईल जामरचा विचार करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.

बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. दरम्यान यंदा देखील इयत्ता बारावीच्या परीक्षेला पेपरफुटीचे चांगलेच ग्रहण लागले. जवळपास 1 हजार 39 कॉपी केसेस, तोतयेगिरी करणारे 12 आणि इतर 9 असे एकूण 1 हजार 60 गैरप्रकार मंडळाने उघडकीस आणले. त्या पार्श्‍वभूमीवर परीक्षेदरम्यान मंडळाकडून काय पावले उचलण्यात येणार आहेत, असे विचारले असता काळे म्हणाल्या, परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांसह अन्य लोकांना इलेक्ट्रॉनीक गॅझेट वापरण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. संवेदनशील आणि अन्य परीक्षा केंद्रांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार आहे. तसेच एखाद्या ठिकाणावरून जर पेपर परीक्षा केंद्रांवर घेऊन जाण्यात येत असतील तर अशा ठिकाणांवरील अंतराचा देखील सर्व्हे करण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान जे काही गैरप्रकार झाले त्याचा बोर्डाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. 

सायबर सेलकडे तक्रार

निकालाच्या अगोदर सोशल मीडियावर निकालाच्या तारखांवरून अफवांना ऊत आलेला असतो. त्यामुळे यंदा प्रथमच याची चौकशी करण्यासाठी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, अशा प्रकारे अफवा पसरवणार्‍यांचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच माध्यमांना देखील निकालासंदर्भात अफवा किंवा चुकीचे वृत्त देऊ नये, अशा प्रकारची विनंती मंडळाच्या अध्यक्षा काळे यांनी केली आहे.