Thu, Jun 20, 2019 00:30होमपेज › Pune › फ्लेक्स व्यवसायावरही बंदीची कुर्‍हाड

फ्लेक्स व्यवसायावरही बंदीची कुर्‍हाड

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 02 2018 12:40AMपुणे : हिरा सरवदे 

प्लॅस्टिकचा अंश असलेल्या फ्लेक्सची तपासणी करण्यासंबंधी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेस महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रस्ताव पाठवला आहे. त्यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर शहरातील फ्लेक्स दुकानांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे फ्लेक्सच्या व्यावसायावरही आता कुर्‍हाड कोसळणार असल्याची चिन्हे दिसत आहे. दरम्यान प्लॅस्टिकबंदीमुळे हॉटेल, भाजीपाला आणि इतर व्यवसायिकांचे व्यवसाय कमी झाल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.

प्लॅस्टिकपासून बनविण्यात येणार्‍या पिशव्या, ताट, ग्लास, चमचे, प्लेट तसेच हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी भांडी, स्ट्रॉ, पॉलिप्रोपीलेन बॅग्ज, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लॅस्टिक पाऊच, हॉटेलमध्ये पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिकचे साहित्य वापरण्यास, साठवून ठेवण्यास, वितरीत करण्यास, विक्री करण्यास राज्यात बंदी आहे. 

प्लॅस्टिक बंदी केल्यानंतरही प्लॅस्टिकच्या पिशव्यांची विक्री आणि वापर होत असल्याचे आढळत होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा विभागाने कारवाईची धडक मोहीम हाती घेऊन शहरात विविध दुकांनामध्ये आणि मॉलमध्ये धाडीचे सत्र सुरू केले. या मोहिमेंतर्गत हजारो किलो प्लॅस्टिक, थर्मोकोल आणि नोन ओवेन प्रोपिलीन (निम्म्यापेक्षा जास्त प्लॅस्टिकचे प्रमाण असलेल्या पिशव्या) जप्त केले आहे. परिणामी शहरातून गोळा होणार्‍या कचर्‍यातील 20 टक्के प्लॅस्टिकचा कचरा कमी झाला आहे. 

पर्यावरणाचा विचार करून आणि फ्लेक्समधील प्लॅस्टिकचा अंश लक्षात घेऊन फ्लेक्स निर्मिती आणि वापरावर बंदी घालण्याचा विचार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा आहे. तत्पूर्वी फ्लेक्सची तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेस प्रस्ताव पाठवला आहे. त्यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर शहरातील फ्लेक्स दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि पालिका सहआयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले आहे. 

हॉटेलसह इतर व्यवसायांवर परिणाम 
शहरात प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर कॅरीबॅग, पॅकींगच्या पिशव्या, चहाचे कप, थर्माकोलचे साहित्य या व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे. हे साहित्य विक्री करण्याचे बंद केल्याने पर्यायी साहित्य आणि त्यांच्या किमती यामुळे 40 ते 50 टक्के व्यवसाय कमी झाला आहे. प्लॅस्टिक चमच्याला पर्याय असला तरी तो महाग आहे. शिवाय कागदी ग्लास आणि प्लेटची किंमत दुप्पट झाल्याने दिवसभराच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. याशिवाय हॉटेलमधून पार्सल घेऊन जाणार्‍यांचे 30 ते 35 टक्के प्रमाण कमी झाले आहे. भाजी विक्रीवरही कॅरीबॅग बंदीचा मोठा परिणाम झाला असल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत.