Wed, Mar 27, 2019 03:55होमपेज › Pune › गोव्याच्या धर्तीवर ‘कला अकादमी’ करा

गोव्याच्या धर्तीवर ‘कला अकादमी’ करा

Published On: Mar 01 2018 2:01AM | Last Updated: Mar 01 2018 12:37AMपुणे : प्रसाद जगताप

ज्येष्ठ नाटककार पु. ल. देशपांडे यांची संकल्पना आणि अलौकिक प्रतिभेचे संगीत नट बालगंधर्व यांचे नामकरण करण्यात आलेल्या ‘बालगंधर्व नाट्यगृहा’ चा लवकरच पुनर्विकास होणार आहे. मात्र, या निर्णयाबद्दल शहरातील नाट्यकर्मींनी नाराजी व्यक्त करत, पुणे महापालिका प्रशासनासमोर ‘अटी-तटीं’ ची सापशिडी उभी केली आहे. बालगंधर्वची इमारत पाडणार असलाच तर महानगरपालिका प्रशासनाने गोव्यात ज्याप्रमाणे कला अकादमी उभारली आहे; त्याप्रमाणे येथेही कला अकादमी उभारावी, अशी मागणी नाट्यकर्मींनी केली आहे.

गोवा प्रशासनाने नाट्यरसिक व नाट्यकर्मींसाठी एक मोठी सुसज्ज कला अकादमी उभारली आहे. त्यात सांस्कृतिक क्षेत्रातील नाट्य, नृत्य, चित्रपट, साहित्य, चित्रकला, कलादालन अशा सर्व गोष्टींचा एका छताखाली समावेश केला आहे. त्याचप्रमाणे पुनर्विकास झालेल्या बालगंधर्व रंगमंदिरातदेखील या सर्व गोष्टी असाव्यात, असे नाट्यकर्मींचे म्हणणे आहे. असे न झाल्यास नाट्यकर्मी आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

पुणे महानगरपालिका प्रशासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. नाट्यकर्मींनी नाविन्याचे स्वागत केले असले, तरी पुणे महानगरपालिका प्रशासन आणि प्रशासकीय कर्मचार्‍यांच्या कामावर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली आहे.

बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याच्या सांस्कृतिक विश्‍वातील पहिली मानाची वास्तू आहे. तत्कालीन पालिका प्रशासनाने ही वास्तू उभारण्याचा निर्णय घेताना, ज्येष्ठ नाट्यकर्मींशी चर्चा केली होती. तसेच पु. ल. देशपांडे यांच्या सारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली या वास्तूची निर्मिती करण्यात आली होती. या वेळीसुद्धा पालिका प्रशासनाने या वास्तूचा पुनर्विकास करताना नाट्यक्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधायला हवा; अन्यथा नाट्यकर्मी या वास्तूच्या पुनर्विकास करण्यास परवानगी देणार नाही, असेही नाट्यकर्मींकडून सांगण्यात आले आहे.

बालगंधर्व रंगमंदिराच्या या वास्तूमध्ये अनेक दिग्गज कलाकार घडले आहेत. या वास्तूशी नाट्यकर्मींंच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिका प्रशासनाने नाट्यकर्मींशी संवाद साधायला हवा. तसेच नाट्यक्षेत्रातील मान्यवरांसमोर नाट्यगृहासंदर्भातील निर्णय घेतले जावेत. यासंदर्भात आम्ही एक-दोन दिवसांत बैठक घेणार आहोत. - सुनील महाजन, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, कोथरूड शाखा.