Thu, Sep 20, 2018 18:34होमपेज › Pune › बालगंधर्वसाठी 'संगीत रसिक' सरसावले

बालगंधर्वसाठी 'संगीत रसिक' सरसावले

Published On: Mar 09 2018 4:14PM | Last Updated: Mar 09 2018 4:14PMपुणे : प्रतिनिधी

बालगंधर्व रंगमंदिर हे समस्त पुणेकर रसिकांसाठी आदराचे स्थान असून कलाकारांसह रसिकांच्याही गळ्यातील ताईत आहे. नटसम्राट बालगंधर्व यांच्या हस्ते या रंगमंदिराचे भूमिपूजन झाले होते.  पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून ही वास्तू साकारली आहे. या जागेचा व्यावहारिक उपयोग करून महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर घालणे ही काळाची गरज असली तरी ही वास्तू पाडण्याच्या भूमिकेला आपला तीव्र विरोध असल्याचे बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर आणि कार्याध्यक्ष स. गो. तथा नाना कुलकर्णी उपस्थित होते. 

आपली भूमिका मांडताना सुरेश साखवळकर यांनी १९७८ साली बालगंधर्वांचे जामाद भास्करराव वाबळे यांनी बालगंधर्व संगीत रसिक मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून गेल्या ४० वर्षात बालगंधर्व रंगमंदिरात आम्ही अनेक संगीत कार्यक्रम सादर केले आहेत. या वास्तूशी आम्हा सर्व कलाकारांचे जीवाभावाचे नाते जडले आहे. त्यामुळे या मूळ वास्तूला बाधा होऊ न देता त्याच्या बाजूने कॉलम उभारून नवीन बांधकाम करावे किंवा बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेवर बांधकाम करावे. या वास्तूमध्ये कलाकार आणि रसिकांच्या भावना गुंतलेल्या आहेत, त्यामुळे याविषयी सर्व घटकांचे म्हणणे ऐकून योग्य तोच निर्णय संबंधितांनी घ्यावा, अन्यथा त्यांना खूप मोठ्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असेही  बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर आणि कार्याध्यक्ष स. गो. तथा नाना कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.