Mon, Mar 25, 2019 04:56
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › बालगंधर्वच्या पुनर्विकासाचे ‘राज’ उलगडले (व्‍हिडिओ)

बालगंधर्वच्या पुनर्विकासाचे ‘राज’ उलगडले (व्‍हिडिओ)

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 10:45AMपुणे : पांडुरंग सांडभोर

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासावरून सद्या जोरदार वांदग सुरू आहे. सत्ताधारी भाजपने  पुनर्विकासाची योजना आणली असली तरी या पुनर्विकासामागील खरा चेहरा आता समोर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा ही संकल्पना मांडली होती व त्यासंबधीचे सविस्तर सादरीकरण त्यांनी केले होते. त्यामुळे यामागील नक्की गणित काय? असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.

पुण्यातील सांस्कृतिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बालगंधर्व रंगमंदिराचे पुनर्विकास करण्याची योजना स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी अंदाजपत्रकात मांडली, या ठिकाणी नव्याने बहुमजली इमारत करून त्यात विविध आकाराची सुसज्ज थिएटर्स, पार्किंग आणि मनोरंजनाच्या विविध सुविधा निर्माण करण्याचा महापालिकेचा मानस आहे, मात्र, त्यासाठी सद्याची बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू जमीनदोस्त करावी लागणार आहे. त्यामुळे कलाकार मंडळींबरोबरच काही राजकीय पक्षांनी त्यास विरोध दर्शविला असून त्यावरून सद्या जोरदार वादंग उठला आहे.

मात्र, बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासामागील एक वस्तुस्थिती आता नव्याने समोर आली आहे. सत्ताधारी भाजपने ही योजना आणली असली तरी पहिल्यांदा ही संकल्पना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सात ते आठ महिन्यांपूर्वीच मांडली होती. ठाकरे यांनी म्हात्रे पूल ते बालगंधर्व रंगमंदिर असा नदीकाठ सुशोभिकरणाच्या प्रकल्पाचे एक सादरीकरण पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्या समोर केले होते. त्यात, बालगंधर्वच्या पुनर्विकासाचा समावेश होता आणि त्यात बालगंधर्वच्या नवीन इमारतीचे सविस्तरपणे सादरीकरण केले होते.

अस्तित्वात असलेल्या इमारतीच्या जागी नवीन बालगंधर्वाची इमारत कशी असेल, त्यात तीन नवीन भव्य मंच, एक कलादालन, उपाहारगृह याशिवाय एक ओपन अ‍ॅफिथिएटर आणि पाकिर्ंगची सुविधा यासंबधीच्या आराखड्याचे व्हिडिओद्वारे सादरीकरण त्यांनी केले होते. दरम्यान ठाकरे यांनी केलेल्या नदी सुधारणा आणि बालगंधर्वच्या पुनर्विकसनावर पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. मात्र, अंदाजपत्रकाच्या माध्यमातून आता बालगंधर्वच्या पुनर्विकासाची योजना पुढे आली आहे, त्यावरून वादळ उठले आहे. मात्र, या सर्वात ‘ना मनसेने, ना राज ठाकरे’ यांनी अद्यापपर्यंत तरी कोणतीही ठोस प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

हा निव्वळ योगायोग का ?

राज ठाकरे यांनी बालगंधर्वची अस्तित्वातील इमारत पाडून त्यावर नवीन सुसज्ज आणि सुविधायुक्त बालगंधर्व उभारण्याची संकल्पना मांडली, त्यानंतर आता सत्ताधारी भाजपने अंदाजपत्रकात बालगंधर्वाच्या पुनर्विकासाची योजना आणली, त्यामुळे हा निव्वळ योगायोग म्हणायचा की, राज यांची संकल्पना भाजपने उचलली असे विविध प्रश्‍न यानिमित्ताने उभे राहिले आहेत.