Wed, May 22, 2019 20:16होमपेज › Pune › बेकरी उत्पादकांचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

बेकरी उत्पादकांचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 29 2018 10:48PMनेहरूनगर : बापू जगदाळे

एखाद्या बेकरीत काचेच्या कपाटात ठेवलेले पदार्थ बघून ते खायची इच्छा झाली नाही तरच नवल ! पण ज्या ठिकाणी ते पदार्थ तयार होतात, ती जागा तुम्ही कधी पाहिली आहे का? नसेल तर आवर्जून पाहा. आयुष्यात कधीही बेकरीतील पदार्थ खाण्याची हिंमत कोणी करणार नाही. घोंघावणार्‍या माशा, पिठातील अळ्या, उंदीर-घुशींचा वावर, कळकटलेली भांडी, शौचालय, मुतारीतील घाणीने माखलेल्या चपला आणि अस्वच्छ कामगार अशा गलिच्छ वातावरणात बेकरीचा माल तयार होतो. बेकरी उत्पादक राजरोसपणे नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाला याचे काहीही सोयरसूतक नाही, असा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

नेहरूनगर बरोबरच पिंपरी- चिंचवड शहरात बेकरीचा माल तयार करणार्‍या असंख्य भट्ट्या आहेत. या भट्ट्यांमध्ये तयार होणारा बेकरीचा माल शहरातील विविध बेकरींमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. मात्र, येथे तयार होणार्‍या उत्पादनाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक बेकरींमध्ये विक्रीसाठी ठेवलेला माल हा अत्यंत निकृष्ट प्रतीच्या पदार्थांपासून बनविलेला असतो. मात्र, ग्राहक त्याबाबतीत अनभिज्ञ असतात. काचेच्या कपाटात ठेवलेला बेकरीचा माल बघून ग्राहक तो विकत घेत असतो. तो खाल्ल्यानंतर विविध आजारांना त्यांना सामोरे जावे लागते. विक्री करण्यात येणार्‍या अन्नपदार्थांबाबत प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. मात्र, अनेक बेकरी उत्पादक जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाच्या पदार्थांपासून बेकरीचा माल तयार करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. अन्न व औषध प्रशासन तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे. 

निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचा वापर 

अनेक बेकरी उत्पादक आपल्या बेकरीतील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत कोणतेच नियम पाळताना दिसत नाहीत. केक, ब्रेड तसेच इतर उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल अत्यंत निकृष्ट प्रतीचा वापरला जातो. अत्यंत घाणेरड्या जागेत अन्नपदार्थ बनवले जातात. याबाबत अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. प्रशासनाने आता कडक पावले उचलणे गरजेचे आहे.

हे तर विकतचे दुखणे 

आज प्रत्येक घरात बेकरीचा माल चवीने खाल्ला जातो. त्यामुळे शहरातील बेकरींमधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. कच्चा माल महागला असल्याचे कारण देत प्रत्येक वर्षी बेकरी उत्पादनांच्या किमती वाढत आहेत. तरीही ग्राहकांची संख्या कमी झालेली नाही. मात्र, निकृष्ट प्रतीचे बेकरीचे पदार्थ खाल्ल्यामुळे  अनेक शारीरिक व्याधी जडत आहेत. बेकरीचा माल म्हणजे विकतचे दुखणे ठरू लागला आहे.

पैशासाठी वाट्टेल ते

बेकरीचे पदार्थ खाणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संधीचा फायदा बेकरी उत्पादक घेऊ लागले आहेत. मागणी तसा पुरवठा या नियमानुसार वाढत्या मागणीला माल पुरविताना बेकरी उत्पादक मालाच्या दर्जाकडे डोळेझाक करत आहेत. पैशासाठी वाट्टेल ते करणार्या आणि ग्राहकांच आरोग्याशी खेळणार्या बेकरी उत्पादकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

अशी आहेत अन्न सुरक्षा कायद्याची मानके

बेकरी उत्पादन होणारा परिसर आणि कक्ष स्वच्छ पाहिजे
कामगारांनी स्वच्छता पाळली पाहिजे
भितींना पोपडे नको, योग्य रंग दिलेला असावा
कच्चा माल योग्य ठिकाणी साठवला पाहिजे
उत्पादित माल साठवण्यासाठी स्वतंत्र कक्ष पाहिजे
कच्चा माल अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार असला पाहिजे
परवानाधारकाकडूनच कच्चा माल खरेदी केला पाहिजे
किती कच्च्या मालात किती पक्का माल बनविला याची नोंद पाहिजे
माल तयार करताना कोणते घटक वापरले याची माहिती दिली पाहिजे
अन्नपदार्थ टेस्ट लॅब पाहिजे, नसल्यास बाहेरून लॅबमधून टेस्ट करून घेतले पाहिजेत
बॅच नंबर टाकूनच मालाची विक्री केली पाहिजे