Thu, Aug 22, 2019 10:54होमपेज › Pune › बैलगाडा मालकांचा मुंबईत धडकणार मोर्चा

बैलगाडा मालकांचा मुंबईत धडकणार मोर्चा

Published On: Mar 15 2018 1:07AM | Last Updated: Mar 15 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी

बैलगाडा शर्यतीसंदर्भातील मागण्या येत्या पंधरा दिवसांत पूर्ण न झाल्यास बैलगाड्यांसह तळेगाव ते मुंबई अशी पदयात्रा काढली जाईल, असा इशारा  बैलगाडा मालकांनी दिला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाडा मालकांनी मंगळवारी आंदोलन सुरू केले होते. मात्र, पोलिस प्रशासनाने रात्री आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच चार बैलांनाही महापालिकेच्या कोथरूड येथील कोंडवाड्यात नेऊन बांधले होते. बुधवारी सकाळी ताब्यातील 28 आंदोलक आणि बैलांची सुटका करण्यात आली. 

राज्य सरकारने बैलगाडा शर्यती चालू करण्याबाबत केलेल्या कायद्याची ताबडतोब अंमलबजावणी करावी. देश-विदेशातून प्राणी कल्याणाच्या नावावर प्रचंड पैसा गोळा करून, भारतामध्ये संस्कृती व परंपरा मोडीत काढण्याचे काम करत असलेल्या ‘पेटा’ या संस्थेवर बंदी घालावी, तसेच संस्थेच्या आर्थिक स्त्रोतांची चौकशी करावी, अशा विविध मागण्यांसाठी बैलगाडा मालक संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  धरणे आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता.

दरम्यान, आंदोलक मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपलेले असताना बंडगार्डन पोलिसांनी 28 आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच 4 बैलांना महापालिकेच्या कोथरुड येथील कोंडवाड्यात नेऊन बांधले होते. बुधवारी सकाळी आंदोलकांची आणि बैलांची सुटका करण्यात आली. बैलांना तब्यात घेऊन त्यांना उपाशी ठेवल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून, त्याविरोधात प्राणी कल्याण बोर्डाकडे तक्रार केली, अशी माहिती बैलगाडा मालकांनी दिली आहे. 

...तर माघार नाही

बैलगाडा मालकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने आठ दिवसांचा आवधी मागितला आहे. परंतु त्यांना पंधार दिवसांचा वेळ देण्यात आला असून, पुढील पंधरा दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास, तळेगाव ते मुंबई अशी पदयात्रा काढली जाणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आझाद मैदानावर आंदोलन सुरू ठेवले जाणार आहे, अशी माहिती रामकृष्ण टाकळकर यांनी दिली.