Thu, May 23, 2019 04:19होमपेज › Pune › बलात्कार पीडितांचा ससूनमध्येही होतो छळ

बलात्कार पीडितांचा ससूनमध्येही होतो छळ

Published On: Apr 05 2018 9:03AM | Last Updated: Apr 05 2018 11:11AMपुणे : देवेंद्र जैन

ससून सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता आलेल्या बलात्कार पीडितांचा, येथील वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, नर्स व डॉक्टरांकडून छळ होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस पीडितेला वैद्यकीय तपासणीकरिता सरकारी रुग्णालयात घेऊन जातात. सदर तपासणीकरिता सोबत असलेल्या महिला पोलिससुद्धा पीडितांचा नाना तर्‍हेने छळ करत असतात. डॉक्टरांकडून पीडितांना व त्यांच्या पालकांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जाते; तसेच वैद्यकीय तपासणीदरम्यान पीडितेच्या पालकांसमोरच संबंधित पीडितेवर अश्‍लील प्रश्नांची सरबत्ती करण्यात येते. याबाबत ‘पुढारी’ प्रतिनिधीकडे काही पीडितांनी माहिती दिली; तसेच यातील काही पीडितांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे लेखी तक्रारी केल्याबाबतचा पुरावाही सादर केला. या महिलांना अपरात्री 2 ते 3 वाजता सोनोग्राफीकरिता नेले जाते. डॉक्टरांबरोबर येथील नर्स व सफाई कर्मचार्‍यांच्या अरेरावीचा फटका या महिलांना बसत आहे.

पुरुष डॉक्टर अनेक लज्जा निर्माण होईल असे प्रश्‍न विचारतात, यावरून महिलांची तपासणी पुरुष डॉक्टर करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रार केल्यानंतर वर्ष, वर्ष कुठलीही कारवाई केली जात नाही. येथील वॉर्डमधील दुर्गंधी पाहून महिला अस्वस्थ होतात; महिलांच्या स्वच्छतागृहात तर तोंडावर रूमाल ठेवूनच जावे लागते.

मासिक पाळीचे पॅड तिथेच टाकले जातात, डॉक्टर ज्या पलंगावर वैद्यकीय चाचण्या करतात, त्यावर सांडलेले रक्त पुसण्याची तसदीसुद्धा येथील सफाई कर्मचारी घेत नाहीत. येथील सफाई कर्मचार्‍यांची घटना बर्‍याच कामात हस्तक्षेप करत असल्याचे तपासणीकरिता आलेल्या पीडितेच्या पालकांनी सांगितले. तसेच जिकडे तिकडे अस्वच्छता असल्यामुळे, ‘भीक नको पण कुत्रे आवर’ असे म्हणायची पाळी या पीडितांवर आली आहे.

ससून रुग्णालयातील नवीन इमारतीच्या समोर असलेल्या पाण्याच्या डबक्यात डेंग्यूच्या अळ्या रोज सापडत आहेत. येथील आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. आरोग्य खात्याचे येथे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आरोग्यमंत्री यांनी ससूनची संपूर्ण पाहणी करणे गरजेचे आहे. राज्य सरकारचे हे रुग्णालय कोणासाठी काम करते, हा मोठा प्रश्न येथील अनेक रुग्ण विचारत आहेत. नवीन इमारत निधीअभावी पडून आहे. इतक्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणत्याही राजकीय नेत्याला वेळ नाही, हे विशेष. उपचारासाठी येथे आलेल्या गरीब रुग्णांचे हाल पाहवत नाहीत. त्यांच्याबरोबर हिडीस फिडीस करणे हे रोजचेच आहे. आता तर बलात्कार पीडितांना त्रास देण्याच्या घटना उघडकीस येऊनही, येथील अधिष्ठाता व सर्व अधिकारी सुस्त बसल्याचे दिसून येते.

Tags : Rape, Victim, Hospital, Sasoon