Fri, Nov 16, 2018 19:41



होमपेज › Pune › मागासवर्ग आयोगाची बैठक २९ जूनला

मागासवर्ग आयोगाची बैठक २९ जूनला

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 1:05AM



पुणे : प्रतिनिधी

मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक शुक्रवार दि. 29 जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे. ही बैठक सकाळी 11 ते 6 या वेळेत होणार होईल. मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीत तज्ज्ञ सदस्य सर्जेराव निमसे, सदस्य दत्तात्रय बाळसराफ, चंद्रशेखर देशपांडे, प्रमोद येवले, रोहिदास जाधव, सुधीर ठाकरे, सुवर्णा रावळ, राजाभाऊ करपे, भूषण कर्डिले, तसेच सदस्य सचिव डी. डी. देशमुख, आयोगाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत. 

या बैठकीत मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात माहिती घेण्यात येईल; तसेच त्यांचे म्हणणे ऐकणे व निवेदने स्वीकारून माहिती संकलित करण्यात येणार आहे. पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रातील ज्या व्यक्ती, संस्था व संघटना यांना निवेदन सादर करावयाचे आहे किंवा म्हणणे मांडावयाचे आहे, त्यांनी लेखी पुरावा व ऐतिहासिक दस्तऐवज किंवा माहितीसह 29 जून रोजी 11 ते 5 या वेळेत विधानभवन सभागृहात जनसुनावणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा व कुणबी, मराठा व कुणबी मराठा, कोकणी मराठा समाजाबरोबर होत असलेले रोटी बेटी व्यवहार, समाजातील श्रमजीवी, शेतमजूर,  रोजंदारी कामगार, महिला कामगार, शिक्षीत पण आरक्षणामुळे नोकरीस मुकलेल्या तरुण वर्गाने, आर्थिक मागास कुटुंबांनी  राज्य आयोगासमोर सादर करावयाच्या निवेदनाचे नमुने वितरित करण्यात आले आहेत.  पुणे शहर व परिसरातील सर्व मराठा संघटना, राजकीय पक्ष, संस्था, मंडळे यांनी  याबाबतचा अहवाल करावयाचा आहे. तसेच वैयक्तिकही आपले निवेदन सादर करू शकता, अशी माहिती सकल मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, तुषार काकडे आणि धनंजय जाधव यांनी दिली.