होमपेज › Pune › स्वच्छ भारत स्पर्धेच्या अव्वल श्रेणीत पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर

स्वच्छ भारत स्पर्धेच्या अव्वल श्रेणीत पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 17 2018 12:40AMपिंपरी : प्रतिनिधी  

केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ शहर’ स्पर्धेत  पिंपरी-चिंचवड शहर दुसर्‍या वर्षीही अव्वल श्रेणीत पिछाडीवर पडले आहे.  गेल्या वर्षी 72 व्या स्थानी असलेले शहर यंदा देशभरातील अव्वल शहराच्या तुलनेत आणखी मागे पडले आहे.  या बाबतचा सविस्तर गटाप्रमाणे निकाल उद्या गुरूवारी (दि.17) प्राप्त होणार आहे. 

स्पर्धेत देशातील लहान-मोठे असे तब्बल 4 हजार 203 शहरांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महापालिका, नगरपरिषद व कॅन्टोन्मेंट बोर्डाचाही समावेश होता. पिंपरी-चिंचवड शहर 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहराचा गटात होते. पहिल्या वर्षी सन 2016ला शहर देशात नवव्या स्थानी म्हणजे महाराष्ट्र राज्यात क्रमांक एकला होते.  गेल्या वर्षी 2017 ला शहराचा क्रमांक देशात 72 व्या स्थानी घसरला. 

केंद्राने बुधवारी (दि.16) उशीरा देशातील प्रथम तीन व विशेष पुरस्कार प्राप्त शहराची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये शहराचा अव्वल गटातील कोणत्याच पुरस्कारासाठी समावेश नाही. त्यामुळे शहर स्वच्छतेमध्ये आणखी पिछाडीवर पडल्याचे स्पष्ट होत आहे. 

शहरातील दैनंदिन कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याने अनेक भागात कचरा समस्या उग्र आहे. तसेच, या कामाची निविदा प्रक्रियाही वादामध्ये अडकून रद्द करण्याची वेळ सत्ताधारी भाजपवर आली आहे. नव्याने शहराचे 4 भाग करून निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यानच्या काळात शहरातील कचरा समस्येबाबतील तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. 

शहर अस्वच्छतेमुळे आणि शहर पूर्णपणे हागदारीमुक्त न झाल्याचा परिणाम म्हणून शहर स्पर्धेतील अव्वल श्रेणीत स्थान प्राप्त करू शकलेले नाही. परिणामी,  शहर स्वच्छतेमध्ये मागे पडत असल्याचे स्पष्ट होते आहे. या संदर्भात पालिका अधिकार्‍यांनी अद्याप सविस्तर निकाल प्राप्त न झाल्याने बोलण्यास नकार दिला.