Thu, Apr 25, 2019 21:32होमपेज › Pune › दप्तराच्या ओझ्याने लहान मुलांना पाठीचे आजार

दप्तराच्या ओझ्याने लहान मुलांना पाठीचे आजार

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 28 2018 1:03AMपिंपरी : पूनम पाटील

लहान मुलांचे शालेय जीवन हे आनंददायी आणि उत्साहीत असले पाहिजे. मात्र तसे न होता आजकाल शाळांमध्ये मुलांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधिक ओझे लादण्यात आले असल्याने त्यांना पाठीच्या दुखण्यासह विविध प्रकारच्या व्याधींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सध्या नजरेस पडत आहे. आधीच पालकांच्या अपेक्षांचे ओझे आणि त्यात दप्तराचे ओझे यामुळे मुलांना स्पर्धेत ढकलण्याच्या नादात त्यांच्या आरोग्याकडे पालकांचे दुर्लक्ष होत  असल्याचे चित्र आहे. 

देशाचे भविष्य म्हणून ज्या मुलांकडे आशेने पाहीले जात आहे. आज त्यांच्याच पाठीवर स्कूल बॅगेच्या रुपात वजनापेक्षा कितीतरी अधिक ओझे लादले जात आहे. त्यामुळे बहुतांश मुलांना लहान वयातच ओझ्यामुळे पाठदुखी, पाठीच्या कण्यात बाक येणे, तसेच बसण्याच्या पोश्चरमधे बाक आल्यामुळे अभ्यासात एकाग्रता नसणे, यासारखे दुखणे सुरु झाले आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या; परंतु शालेय व्यवस्थापन याबाबत गंभीरतेने पावले उचलत नसल्याची तक्रार पालकांमधून केली जात आहे.  प्री नर्सरी व नर्सरीला बॅग लेस, पहिली ते दुसरी- दीड किलो, तिसरी ते पाचवी दोन किंवा तीन किलो तर सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना चार किलोपेक्षा अधिक दप्तराचे ओझे नसावे, दहावीच्या विद्यार्थ्यांनाही पाच किलोपेक्षा अधिक ओझे देता कामा नये, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र सर्वच शाळांमध्ये मुलांना त्यांच्या वजनाच्या दुप्पट वजनाच्या स्कूलबॅग उचलाव्या लागत आहेत. मुले दप्तराच्या ओझ्याने अर्धमेले झाल्याचे दृष्य नजरेस पडत आहे. यामुळे अनेक मुलांना शाळा आवडेनाशी झाली आहे. वजनाच्या क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे दप्तर पाठीवर घेतल्यास खाद्यांचा आकार बदलणे, मान व पाठीचा कणा व कमरेच्या हाडावर दाब येऊन शरीराचे पोश्चर बदलणे, पायांना तसेच टाचांचे दुखणे उद्भवत आहे.