Thu, Feb 21, 2019 03:17होमपेज › Pune › बाळाने गिळला रिमोटचा सेल

बाळाने गिळला रिमोटचा सेल

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 12:55AMआळंदी : वार्ताहर 

सकाळी कुटुंबीय झोपले असताना घरात खेळत असलेल्या चिमुकल्याने रिमोट जमिनीवर आपटला. त्यातून बाहेर पडलेला सेल त्या 11 महिन्याच्या चिमुकल्याने गिळल्याची घटना आळंदी येथील मरकळ रस्ता येथे असलेल्या तनिष्क सोसायटीमध्ये शनिवारी (दि. 23) सकाळी आठवाजेच्या सुमारास घडली. हुजैफ अब्दुल हमीद तांबोळी असे या मुलाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करत सेल बाहेर काढण्यात आला आहे. 

आळंदी येथे तांबोळी कुटुंबीय राहते. शनिवारी सकाळी कुटुंबीयांच्या आधी हुजैफ झोपेतून जागा झाला. खेळता खेळता टेबलावर ठेवलेला रिमोट त्याने घेतला. तो काही वेळा आपटला. त्यातून बटन सेल बाहेर आला. त्या आवाजाने सगळे जागे झाले, पण तोपर्यंत हुजैफने सेल गिळला होता. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. तेथे शस्त्रक्रिया करून तो सेल काढण्यात आला. दरम्यान, हुजैफ आता बरा असूूून धोका टळला असल्याचे रुग्णालयाचे वतीने सांगण्यात आले.