Tue, Jul 23, 2019 18:48होमपेज › Pune › बीआरटी’तून जाणारी वाहने होणार जप्त

बीआरटी’तून जाणारी वाहने होणार जप्त

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 1:29AM

बुकमार्क करा
पुणे: प्रतिनिधी 

‘पीएमपी’ बससाठी उभारण्यात आलेल्या  बीआरटी मार्गातून जाणार्‍या खासगी वाहनांवर ‘पीएमपी’ जानेवारी महिन्यापासून कठोर कारवाई करणार असून, याबाबत पोलिसांकडे तक्रार करून वाहने जप्त केली जातील आणि त्यांचा  लिलावही करण्यात येईल, असा इशारा ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

शहरातील प्रवाशांना जलद सेवा मिळावी या उद्देशाने पीएमपी बससाठी बीआरटी मार्ग तयार करण्यात आले. परंतु, संगमवाडी ते सादलबाबा चौकादरम्यान अनेक खासगी वाहने बीआरटी मार्गातून जातात. त्यावर अंकुश लावण्यासाठी प्रशासनाने खासगी वॉर्डन नियुक्त केले होते.  परंतु, त्यांनाच हे वाहनचालक अरेरावी करतात. काही  महिन्यांपूर्वी  एका वॉर्डनला मारहाण करण्यात आली. त्यात तो जखमी झाला. ही बाब लक्षात घेऊन  बीआरटी प्रवेशाच्या ठिकाणी एक दोरी लावून वाहने अडवण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, रात्रीच्या वेळी वॉर्डन नसल्याने नागरिक  वाहने भरधाव वेगाने नेत असल्याचे  दिसून आले. त्यामुळे पीएमपीने हा निर्णय घेतला आहे. 

तुकाराम मुंढे म्हणाले,“बीआरटी मार्ग हे केवळ पीएमपीच्या बससाठी आहेत. या मार्गातून  खासगी वाहने चालविता येत नाहीत. मात्र, काही ठिकाणी रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे बीआरटीतून वाहने चालविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अशा प्रकारे घुसखोरी करणार्‍या वाहनांवर कारवाई सुरू आहे. परंतु,  जानेवारी महिन्यासून ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे.