Thu, Jul 18, 2019 21:49होमपेज › Pune › बीआरटी मार्गात घुसणारी खासगी वाहने होणार जप्त 

बीआरटी मार्गात घुसणारी खासगी वाहने होणार जप्त 

Published On: Dec 30 2017 6:45PM | Last Updated: Dec 30 2017 6:45PM

बुकमार्क करा
पुणे: प्रतिनिधी 

पीएमपी बसेस जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या  बीआरटी मार्गातून बेकायदेशीपणे घुसणा-या  खासगी वाहनांवर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने (पीएमपीएल) आता कठोर कारवाईचा  बडगा उगारण्यात येणार आहे. ही कारवाई  जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात येणार असून, याबाबत  पोलिसांकडे तक्रार करून संबंधित वाहने जप्त केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे जप्त वाहनाचा  लिलाव सुध्दा करण्यात येईल. असा इशारा  पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक तथा  अध्यक्ष  तुकाराम  मुंढे यांनी दिला आहे.

शहरातील प्रवाशांना जलद सेवा मिळावी. त्यांना कामाच्या ठिकाणी लवकर पोहचता यावे या उद्देशाने पीएममी बसेससाठी  बीआरटी मार्ग तयार करण्यात आले. परंतु, संगमवाडी ते सादलबाबा चौका दरम्यान अनेक खासगी वाहने बीआरटी मार्गात घुसतात,  यासाठी पीएमपीएल प्रशासनाने खासगी वॉर्डन नियुक्त केले होते.  परंतु, बीआरटी मार्गाच्या शेजारी  राहणारे नागरिक  वॉर्डनबरोबर   अरेरावी करीत असतात. तसेच अर्वाच्च भाषा वापरतात.  वेळप्रसंगी धमकावलेसुध्दा जाते. वॉर्डनने गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्यास काहीजण त्यांच्या अंगावर वाहने घालण्याचा प्रयत्न करतात. मागील काही  महिन्यांपूर्वी  एका घटनेत वॉर्डन जखमी झाला होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार  करण्यात आले होते. ही बाब लक्षात घेऊन  बीआरटी प्रवेशाच्या ठिकाणी एक दोरी लावून वाहने अडवण्यास सुरूवात करण्यात आली होती. मात्र, रात्रीच्या वेळी  मार्गावर वॉर्डन नसल्याने नागरिक वाहने भरधाव वेगाने नेत असल्याचे  दिसून आले आहे.

याबाबत माहिती देताना मुंढे म्हणाले, ‘बीआरटी मार्ग हे केवळ पीएमपीच्या बसेससाठी आहेत. या मार्गातून  खासगी वाहने चालविता येत नाहीत. मात्र काही ठिकाणी रात्रीच्यावेळी बेकायदेशीरपणे बीआरटीतून वाहने चालविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अशा प्रकारे घुसखोरी करणा-या वाहनांवर  कारवाई सुरू आहे. परंतु, जानेवारी महिन्यासून ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे. बेकायदेशीरपणे  घुसखोरी करणा-या वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित वाहने जप्त करून त्यांचा लिलाव केला जाईल. असे त्यांनी स्पष्ट केले.